मंगळवारी दिवसभरात २१ रुग्णांची नोंद;  चार दिवसांत तिघांचा मृत्यू; खासगी रुग्णालयांत विशेष कक्ष

नुकतेच जोर धरलेल्या पावसामुळे संसर्गजन्य आजारांची मालिका सुरू झाली असतानाच, ठाणे शहरात ‘स्वाइन फ्लू’च्या आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांमध्ये स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढल्याचे आढळले असून मंगळवारी अवघ्या एका दिवसात २१ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये तीन जणांचा ‘स्वाइन फ्लू’मुळे मृत्यू झाल्याची नोंद पालिकेकडे आहे. विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनाही या आजाराची बाधा झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात स्वाइन फ्लूची लागण झालेले रुग्ण आढळून येत होते. मात्र, जून महिन्यामध्ये या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये आतापर्यंत संपूर्ण शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेले १३३ रुग्ण आढळले असून त्यांपैकी चार रुग्ण महापालिका क्षेत्राबाहेरील होते. या १३३ पैकी ७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या सातपैकी तीन रुग्ण अवघ्या चार दिवसांपूर्वी दगावले आहेत. त्यामुळे या आजाराने शहरात डोके वर काढल्याचे चित्र आहे.

जून महिन्यांमध्ये खासगी रुग्णालयात सर्दी, खोकला, ताप आणि घशाला सूज आल्याने उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये डॉक्टरांना स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या रुग्णांची स्वाइन फ्ल्युची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये त्यांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. जून महिन्यातील रुग्णांचा नेमका आकडा समजू शकलेला नसला तरी या आजारामुळे तीन रुग्ण चार दिवसांपूर्वी दगावले आहेत. ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्याने डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. या तपासणीचा अहवाल मंगळवारी आला असून त्यामध्ये २१ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी १७ रुग्ण ठाणे शहरातील तर उर्वरित ४ रुग्ण शहराबाहेरील आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी.केंद्रे यांनी दिली.

सर्दी, खोकला, ताप आणि घशाला सूज आली असेल तर त्या रुग्णांनी तात्काळ स्वाइन फ्लूची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. केंद्रे यांनी केले. स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिका आरोग्य विभागाने तातडीने जनजागृती मोहीम हाती घेतली असून या मोहिमेचा एक भाग म्हणून बुधवारी शहरातील खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. या बैठकीत स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांत विशेष कक्ष उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वसई, नवी मुंबईतही बाधा

वसई-विरार आणि नवी मुंबई शहरांमध्येही स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या आठवडय़ाभरात वसईत स्वाइन फ्लूने बाधित तीन रुग्ण दगावले असून अन्य १२ रुग्णांची नोंद झाली आहे. पनवेलमध्ये विविध रुग्णालयांत आठ रुग्ण उपचार घेत आहेत.