उकाड्यानं अंगाची लाहीलाही होत असल्याने पोहण्यासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा भातसा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शहापूर तालुक्यातील खरीवली येथे ही दुर्घटना घडली.
मयूर देसले (वय २४) असे या मृत तरुणाचे नाव असून तो आवरे येथे राहणारा आहे. दुबार पीक घेण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्यात आलं असल्याने खरीवली येथील चौघे व आवरे येथील एक असे पाच तरुण रविवारी संध्याकाळी खरीवली जवळील भातसा कालव्यात पोहण्यासाठी गेले होते.
कालव्याच्या पाण्यात तयार झालेल्या भोवऱ्यामध्ये मयूर अडकल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. भातसा कालव्याचे पाणी संध्याकाळी बंद केल्यानंतर रविवारी रात्री समीर चौधरी व प्रदीप गायकर या स्थानिक तरुणांनी मयूरचा मृतदेह शोधून बाहेर काढला. अन्य चौघेजण व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 4:08 pm