लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ‘पिंक अर्बन’ प्रसाधनगृह आणि विश्रांतीगृह (रेस्टरूम) सुरू करण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले जात नसल्याने सोमवारी महिला दिनी भाजपच्या नगरसेविका आणि महिला रिक्षा चालकांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले सात विश्रांतीगृह आठवडाभरात सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांची कुचंबणा होऊ  नये या उद्देशातून ठाणे महापालिकेने शहराच्या विविध भागांत कोटय़वधी रुपये खर्च करून १६ प्रसाधनगृहे आणि विश्रांतीगृहे उभारली आहेत. यामध्ये स्वच्छतागृह, स्तनपान कक्ष, सॅनटरी नॅपकीन, वेंडिंग मशिन, चेंजिंग कक्ष आणि एटीएम मशीन यांसारख्या सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून यातील केवळ दोनच प्रसाधनगृहे सुरू झाली आहेत. त्यामुळे उर्वरित प्रसाधनगृहे सुरू करण्याची मागणी भाजपच्या ठाणे महिला मोर्चा शहराध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्यावेळी प्रसाधनगृह तात्काळ सुरू करण्यात येतील असे आश्वासन पालिकेने दिले होते. मात्र, ती अद्यापही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे सोमवारी जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर शहराध्यक्ष मृणाल पेंडसे, भाजप महिला नगरसेविका आणि महिला रिक्षा चालकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. अखेर स्मार्टसिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले १२ पैकी ५ प्रसाधनगृह सुरू असल्याचे सांगत उर्वरित प्रसाधनगृह आठ दिवसात सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेने दिले. तसेच इतर निधीतून उभारण्यात आलेले प्रसाधनगृह महिनाभरात सुरू करण्यात येणार असल्याचेही आश्वासन पालिकेने दिले आहे. या आश्वसनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. तसेच आठ दिवसानंतरही प्रसाधनगृह सुरू झाले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा पेंडसे यांनी दिला आहे.