आवश्यक दुरुस्तीसोबत रंगरंगोटीही करणार

ठाणे शहराचे वेगळेपण दाखवून देण्यासाठी रस्ते, सार्वजनिक भिंती, पदपथ  ‘ब्रॅण्ड ठाणे’च्या रंगांनी रंगवणाऱ्या पालिकेने आता सार्वजनिक शौचालयांकडे मोर्चा वळवला आहे. सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसह त्या ठिकाणीही ‘ब्रॅण्ड ठाणे’ची रंगरंगोटी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. स्वच्छ भारतअंतर्गत २० दिवसांत १२०० शौचालयांचे रूपडे बदलण्यात येणार आहे.

शहरात स्वच्छता राखण्यासह शहराचे सौंदर्य अधिक खुलवेल, अशा रंगसंगतीचा वापर करून रस्ते, पदपथ, सार्वजनिक भिंती रंगवण्याचा उपक्रम महापालिकेने दिवाळीच्या तोंडावर हाती घेतला होता. पिवळा, पानेरी निळा आणि हिरवा अशा तीन रंगांत रंगरंगोटी केल्यामुळे दिवाळीत शहर उजळले होते. आता महापालिका प्रशासनाने सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती आणि त्यांना ‘ब्रँड ठाणे’च्या रंगांनी रंगविण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येऊ लागल्या असून या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने शौचालयांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.

‘ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये असलेल्या एकूण १२०० शौचालयांमध्ये दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिकेतील ४० अभियंत्यांची नेमणूक करण्यात येणार असून प्रत्येकाकडे तीन ते चार शौचालये दिली जाणार आहेत,’ असे ठाणे महापालिकेचे शहर अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून सर्वच सार्वजनिक शौचालये ‘ब्रँड ठाणे’च्या रंगांनी रंगविण्यात येणार आहेत. येत्या वीस दिवसात ही कामे पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे, असे ते म्हणाले.

स्टीलचे भांडे..

सार्वजनिक शौचालयामध्ये चिनीमातीची भांडी बसविण्यात येतात. मात्र, ही भांडी फुटून शौचालयांची दुरवस्था होते. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांमधील चिनीमातीची भांडी बदलून त्याठिकाणी स्टीलचे भांडे बसविण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्यामुळे त्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे.