गुंतवणूक करायची झाली तर महागाईचासुद्धा विचार केला पाहिजे आणि ही गुंतवणूक महागाई वाढल्यानंतरच नाही तर अगदी कमी वयापासूनच करायला हवी. सुयोग्य गुंतवणूक जितकी जास्त तितका परतावा जास्त, असा मोलाचा सल्ला अर्थविषयक तज्ज्ञांनी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या कार्यक्रमात ठाणे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. म्युच्युअल फंडविषयक जनजागृती आणि प्रसार करणाऱ्या ‘म्युच्युअल फंड सही है’ प्रस्तुत आणि आघाडीची रोखे भांडार संस्था ‘सीडीएसएल’ सहप्रायोजक असलेला ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची ओळख, त्याची माहिती आणि स्वरूप याविषयी ‘अ‍ॅम्फी’चे संदीप वाळुंज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर डीमॅटच्या फायद्याबाबत ‘सीडीएसएल’च्या गुंतवणूकदार साक्षरता विभागाचे निवृत्त प्रमुख चंद्रशेखर ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘गुंतवणूक हा आपल्याकडे दुर्लक्षित विषय आहे. त्याची अधिक साक्षरता होणे गरजेचे आहे. जेवढे पैसे आपल्याला मिळतात ते सर्व खर्च करू नयेत. मिळालेल्या पैशातली पहिली बचत बाजूला काढावी आणि नंतर इतर पैसे खर्चासाठी वापरावे,’ असे संदीप वाळुंज यांनी सांगितले. आपण पैसे कुठे गुंतवतो हे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना त्याची खात्री करावी. गुंतवणुकीचे विविध प्रकार आहेत. यापैकी जास्त परतावा मिळणारी गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक होय. तरलता, उत्तम नियंत्रण, पारदर्शकता, लहान रक्कम, कमी खर्च आणि व्यावसायिक व्यवस्थापन ही म्युच्युअल फंडाची वैशिष्टय़े आहेत. म्युच्युअल फंड ही जोखीम आहे. मात्र जोखीम घेतली नाही तर परतावाही मिळत नाही. म्युच्युअल फंडात डेब्ट आणि इक्विटी या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत, असेही वाळुंज यांनी सांगितले.

डीमॅटच्या फायद्यांबाबत चंद्रशेखर ठाकूर यांनी उपस्थितांना माहिती दिली. सोने-चांदी यांचे दागिने खरेदी करणे म्हणजे गुंतवणूक नाही. डीमॅटच्या खात्याचा फायदा अनेक गोष्टींसाठी होतो. डीमॅटमध्ये सुरक्षितता आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील वालावलकर यांनी केले. या कार्यक्रमाला ठाणे पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपुल्ले, विधि सल्लागार मकरंद काळे, साहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित उपस्थित होते.