तीन दिवसांत २८ लाख ३६ हजारांचा दंड वसूल

नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित पाटर्य़ामध्ये मद्य रिचवून स्वत: वाहन चालवत घरी परतणाऱ्या एक हजार ३२७ तळीरामांची झिंग ठाणे वाहतूक पोलिसांनी उतरविली. तब्बल १४ लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तीन दिवस सुरू असलेल्या या मोहिमेत दोन हजार मद्यपी चालकांवर कारवाई करून २८ लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतूक शाखेचे ८० पोलीस अधिकारी आणि ४५० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे हेसुद्घा सकाळपर्यंत पथकांच्या भेटी घेऊन कारवाईची पाहाणी करत होते. येऊरच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक पोलिसांनी पथके तैनात होती.

कारवाईची आकडेवारी..

  • ठाणे वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत २९ डिसेंबरला २०५ मद्यपी चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाख ६४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
  • ३० डिसेंबरला ३९६ मद्यपी चालकांकडून १० लाख ६६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
  • ३१ डिसेंबरला एक हजार ३२७ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १४ लाख ५ हजार इतका दंड वसूल करण्यात आला.