ठाणे : मैत्रिणीचे छायाचित्र आणि काही चित्रफिती पाकिस्तानी मित्राला देऊन त्याच्या माध्यमातून एक लाख रुपयांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या २८ वर्षीय तरुणाला बुधवारी रात्री ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाइल फोन आणि सिमकार्ड जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वर्तकनगर भागात सीमा (बदललेले नाव) ही तरुणी राहते. ती घोडबंदर येथे कामाला असून दोन वर्षांपूर्वी तिची ओळख रवी (बदललेले नाव) याच्यासोबत झाली. काही दिवसांनी या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, पाच महिन्यांपूर्वी ते विभक्त झाले. तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी सिमाच्या मोबाइल क्रमांकावर एक आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून संदेश आला. त्या संदेशात तुझे आणि रवीचे फोटो तुझ्या घरच्यांना पाठवेल अशी धमकी देण्यात आली होती. घाबरलेल्या सीमाने तात्काळ रवीला फोन करून याची माहिती दिली. तसेच त्याला खोडसाळपणा बंद करण्यास सांगितला. मात्र, रवीने आपण असे केले नसल्याचे सांगत त्याचा छायाचित्र आणि चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह गहाळ झाल्याचे तिला सांगितले. या घटनेनंतर सीमा घाबरली होती. त्यातच काही दिवसांनी सीमाचा भाऊ आणि त्याच्या मित्रांच्या मोबाइल क्रमांकावर एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून सीमाची काही छायाचित्रे आली. ही छायाचित्रे समाजमाध्यमावरून प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यानंतर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून सुरू झाला.

पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी रवीला चौकशीसाठी बोलावले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. रवीने काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानातील मुशरफ नावाच्या एका तरुणासोबत फेसबुकवर मैत्री केली होती.  या दोघांनी तिच्याकडून खंडणी उकळण्याची योजना आखली. या गुन्ह्य़ाप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.