करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुमच्या भावाला, पतीला घराबाहेर पडू देऊ नका. महिलांनो ही जबाबदारी तुमची आहे असं आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केलं आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर गेली आहे. त्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे असंही फणसाळकर यांनी स्पष्ट केलं. काही वेळापूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केलं. एवढंच नाही तर माझ्या नावाने फिरत असलेली ऑडिओ क्लिप माझी नाहीच, अशा प्रकाराच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असंही आवाहन त्यांनी केलं आहे. ठाण्यात १ नवा रुग्ण आढळला आहे. त्यादृष्टीने खबरदारी घ्या, घराबाहेर पडू नका आम्हाला आणि सरकारला सहकार्य करा असंही त्यांनी म्हटलं आहे.

करोनाचे महाराष्ट्रात १२४ रुग्ण आढळले आहेत. भारतातही ही संख्या ६०० च्या वर गेली आहे. अशात संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. ही मुदत १४ एप्रिलच्या पुढेही जाऊ शकते अशीही शक्यता आहे. दरम्यान सगळ्यांनी काळजी घ्यावी असंही आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे.