ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची वाट अडवून दुकाने थाटणारे फेरीवाले अचानक गायब झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. एल्फिन्स्टन स्थानकामध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकारानंतर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना सर्वानी कोंडीसाठी जबाबदार धरले. त्यानंतर स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाईसुद्धा करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मुंबईतील मोर्चासमोर केलेल्या भाषणात फेरीवाल्यांना निर्वाणीचा इशारा दिला. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून की काय स्थानक परिसरात शुक्रवारी तुलनेने शुकशुकाट होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एरवी फेरीवाल्यांमुले गजबजलेली असणारी अनेक ठिकाणे फेरीवाले गायब झाल्यानंतर भकास दिसत होती. डोंबिवली, ठाणे यांसारख्या गर्दीच्या स्थानकांच्या आजूबाजूचा परिसर आणि पादचारी पूल हा फेरीवाल्यांनी वेढलेला असायचा. अरुंद जागा आणि त्यामध्ये फेरीवाल्यांचे बस्तान यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना होणारा नाहक त्रास तूर्तास टळला आहे. ठाणे स्थानकाच्या सॅटिसच्या पुलाखाली फेरीवाल्यांची वर्दळ असायची. पुस्तके, पाकीट, गजरा, सुगंघी द्रव्य अशा अनेक वस्तू विकणारे हे फेरीवाले अनेक वेळा त्याच ठिकाणी स्वत:च्या खाण्या-पिण्याची आणि स्वयंपाकाची सोयसुद्धा करतात. त्यामुळे प्रवाशांना फक्त अरुंद जागेचाच नाही तर घाणीचासुद्धा त्रास सहन करावा लागत होता.

डोंबिवली स्थानकाच्या कल्याण दिशेकडील रेल्वे मार्गावरील पादचारी पुलाचा वापर नागरीकांकडून अधिक प्रमाणात होतो. अरुंद पूल आणि फेरीवाल्यांचे बस्तान यामुळे या पुलाचा वापर करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो. फेरीवाल्यांना हटवल्यामुळे प्रवासांना वाढीव जागा मिळाली आहे.

हकालपट्टी केलेल्या फेरीवल्यांची वापसी होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांमार्फत विशेष काळजी घेण्यात येत आहे.रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी स्थानक परिसरात जागोजागी फेर फटका मारतानाचे चित्र सर्वच महत्त्वाच्या स्थानकामध्ये दिसत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane station hawkers issue
First published on: 07-10-2017 at 03:49 IST