एकेकाळी मुंब्रा शहर काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा. गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीने मुंब्य्रात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मागील महापालिका निवडणुकांमध्ये या भागातून राष्ट्रवादीचे नगरसेवक मोठय़ा संख्येने निवडून आले. त्यामुळे मुंब्रा परिसर राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखला जातो. ठाणे महापालिका निवडणुकीत समाधानकारक आकडा गाठायचा असेल तर राष्ट्रवादीला मुंब्य्रात चांगली कामगिरी करण्यावाचून पर्याय नाही. या परिसरातील तब्बल २० जागांपैकी अधिकाधिक जागा पक्षाला मिळतील असा राष्ट्रवादीच्या नेत्यांना विश्वास आहे. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड हा या भागातील राष्ट्रवादीचा मुख्य चेहरा आहे. असे असले तरी काँग्रेसने आघाडीच्या धर्माला दाखविलेल्या वाकुल्या आणि एमआयएमने आक्रमक पद्धतीने सुरू केलेला प्रचार यामुळे राष्ट्रवादीची या भागातील डोकेदुखी वाढली आहे. मुंब्य्रातील काँग्रेसचे बडे प्रस्थ राजन किणे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने विरोधी पक्षांच्या आव्हानातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेसने येथील जवळपास सर्वच जागांवर उमेदवार उभे करत राष्ट्रवादीला आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंब्य्रातील काही भागांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक वर्षांनुवर्षे निवडून येत आहेत. मुस्लीमबहुल परिसर असलेल्या एका प्रभागात शिवसेनेने अपक्षांचे पॅनेल उभे केले आहे. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी पक्षात लढत असतानाच दुसरीकडे एमआयएम पक्षानेही मुंब्य्रामध्ये तब्बल २१ उमेदवार उभे केले आहेत. एमआयएमच्या उमेदवारांना शिवसेनेची रसद असल्याचे चित्र राष्ट्रवादीने आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एमआयएम ही शिवसेनेची बी टीम असल्याचा प्रचारही राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे मतविभाजन टाळले जाईल, अशी आशा राष्ट्रवादीच्या नेत्यांना असली तरी प्रत्यक्ष मतदानात हा प्रचार कामी येतो का हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रभाग क्षेत्र क्रमांक २६

  • प्रभाग क्षेत्र – हनुमाननगर, गौतमनगर, देवीपाडा, शैलेशनगर.
  • मतदार – ३८७७९

मुंब्य्रातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये हनुमाननगर, गौतमनगर, देवीपाडा, शैलेशनगर हा परिसर येतो. या प्रभागात शिवसेनेने विद्यमान नगरसेवक बालाजी काकडे यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवारांचे पॅनेल उभे केले आहे. काकडे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे मोहमद गौस (बबलु) शेमना, भाजपचे फारुकी मोहमद काशीद हकीम, एमआयएमचे सर्फराज पठाण उभे आहेत. त्यामुळे या प्रभागातील ही लढत सर्वात लक्षवेधी आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी नगरसेविका अनिता किणे आणि काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक यासीन कुरेशी हेसुद्धा याच प्रभागातून निवडणूक लढवीत असून त्यांच्यासमोर शिवसेनेने अपक्ष, एमआयएम आणि भाजपने उमेदवार उभे करून त्यांना आव्हान दिले आहे.