केंद्र आणि राज्य शासनापाठोपाठ आता महापालिका ‘स्वच्छ ठाणे’ अभियान राबविणार असून त्याअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी ‘बायो स्वच्छतागृहे’ उभारण्यात येणार आहेत. या मोहिमेअंतर्गत महिलांसाठी जास्तीत जास्त स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे. विशेष म्हणजे, या अभियानांतर्गत झोपडपट्टी वस्त्यांमधील घरांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारणीकरिता परिसरातून मलनि:सारण वाहीन्या टाकण्याचे कामही करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत आणि राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र या अभियानाच्या धर्तीवर संपुर्ण शहरात ‘स्वच्छ ठाणे’ अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत केली. या अभियानांतर्गत शहरातील विविध ठिकाणी मोफत ‘बायो स्वच्छतागृहे’उभारण्यात येणार असून त्यासाठी काही संस्थांसोबत चर्चा सुरू आहे. शहरामध्ये महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नसल्यामुळे महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या अभियानात महिलांसाठी जास्तीत जास्त ‘बायो स्वच्छतागृहांची’ निर्मिती करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरामध्ये स्वच्छतागृहांची गरज नेमकी कोणत्या ठिकाणी आहे आणि अशा स्वरुपाची स्वच्छतागृहे कोणत्या ठिकाणी उभारली पाहीजेत, याचा सविस्तर अभ्यास करण्यात येणार असून त्यानंतरच स्वच्छतागृहांची निर्मिती केली जाणार आहे, असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधींनाही जागेचे पर्याय सुचविण्याचे आवाहन केले.
शहरातील एकही नागरिक उघडय़ावर प्रातविधीकरिता बसू नये, यासाठी घरात स्वच्छतागृह नसलेल्या कुटुबांना स्वच्छता गृह उभारणीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून चार तर राज्य शासनाकडून आठ असे बारा हजारांचे अनुदान प्रत्येक कुटूंबाना मिळणार असून स्वच्छतागृह उभारणीसाठी झोपडपट्टी वस्त्यांमध्ये मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात येणार आहे. तसेच घरात स्वच्छतागृह उभारण्यास जागा नसेल तर त्या परिसरात सामुहिक स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बायो स्वच्छतागृहे म्हणजे काय ?
‘स्वच्छ ठाणे’ अभियानांतर्गत शहरात उभारण्यात येणाऱ्या बायो स्वच्छतागृहांकरिता स्वतंत्र मोठी सेफ्टी टँकची किंवा मलनि:सारण वाहिन्या टाकण्याची गरज नाही. या स्वच्छतागृहांमध्ये छोटय़ा टाक्या बसविण्यात येणार असून तिथेच मैलावर बॅकटेरियाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेत मैला नष्ट होऊन स्वच्छ पाणी पुन्हा वापराकरिता मिळणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.