नरेश मणेरा यांचा प्रशासनावर पत्रहल्ला

घोडबंदर परिसरातील भाईंदरपाडा येथील मैदान शिवसेनेतील एका बडय़ा नेत्याच्या बांधकाम कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तूर्तास मागे घेतला असला तरी या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेनेतील खदखद संपता संपत नसल्याचे चित्र आहे. या मुद्दय़ावर भाईंदरपाडा परिसरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र पाठवून जोरदार टोलेबाजी केली आहे. शहरात डीजी ठाणे, खाडीकिनारा विकासावर कोटय़वधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेस एका मैदानाची देखभाल करणे का परवडणारे नाही, असा सवाल मणेरा यांनी या पत्रात केला आहे. मणेरा यांच्या या पत्रकबाजीमुळे शिवसेना नेत्यांनाही घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे.

आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेपुढे मांडलेल्या या प्रस्तावास शिवसेना नगरसेवकांनी विनाचर्चा बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली होती. पक्षातील बडय़ा नेत्यांच्या हितासाठी विनाकारण आपण टीकेचे धनी ठरल्याची सल आता शिवसेना नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटाला बोचू लागली आहे. घोडबंदर भागातील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी या मुद्दय़ावर जाहीर भूमिका घेत भाईंदरपाडा मैदानाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फेच केले जावे, असे पत्र आयुक्त जयस्वाल यांना पाठवीत पक्षनेत्यांना घरचा आहेर दिला आहे.

मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनातर्फे शहरातील मैदाने बिल्डरांना भाडेतत्त्वावर देण्याचे वादग्रस्त धोरण मांडण्यात आले होते. या धोरणाच्या माध्यमातून भाईंदरपाडा येथील ३५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे भलेमोठे मैदान शिवसेनेच्या एका बडय़ा नेत्याच्या बांधकाम कंपनीस ३० वर्षांकरिता भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला होता. भाईंदरपाडा भागातून शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले असून या ठिकाणचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी या प्रस्तावास विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. ठाणे शहरात मोठय़ा मैदानांची संख्या अगदीच नगण्य असताना असा प्रस्ताव मांडणे शहरहिताचे नाही, अशी मणेरा यांची भूमिका होती. मात्र, कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर करायचा, असे आदेश नेत्यांकडून आल्याने मणेरा यांना सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर बोलू देण्यात आले नाही. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मणेरा यांना बोलण्यापासून रोखल्याचे सभागृहात सर्वानी पाहिले. विनाचर्चा हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनावर टीकेची झोड उठताच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी या मुद्दय़ावरून शिवसेनेतील खदखद अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.

हे तर हास्यास्पद आहे..

नेत्यांच्या हितासाठी मैदान भाडेपट्टय़ावर देण्याचा प्रस्ताव विनाचर्चा मंजूर केल्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या शिवसेना नगरसेवकांच्या एका गटात कमालीची अस्वस्थता असून प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेताच ही खदखद आता बाहेर पडू लागली आहे. ठाणे शहरात डीजी ठाणे, खाडीकिनारा सुशोभीकरण असे कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव आखले जात असताना शहरातील एका मैदानाच्या सुशोभीकरणाचा तुलनेने ‘किरकोळ’ खर्च करणे महापालिकेस परवडत नसेल तर हे हास्यास्पद आहे, असा टोला या भागातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी आयुक्त जयस्वाल यांना पाठविलेल्या पत्रात लगाविला आहे. भाईंदरपाडा येथील बिल्डरला दिले जाणाऱ्या ‘त्या’ मैदानाची देखभाल महापालिकेने स्वखर्चातून करावी, अशी मागणीही मणेरा यांनी केली आहे.