वसई : करोनाच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन केला असल्याने वसईच्या शहरी भागाच्या ठिकाणी कामधंद्यानिमित्ताने पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी हाताला काम नसल्याने थेट गावाचा रस्ता पकडला आहे. ये-जा करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे वाहन रस्त्यावर फिरत नसल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पायी प्रवास सुरू केला आहे.

दरवर्षी पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा यांसह इतर खेडय़ापाडय़ातील मोठय़ा संख्येने मजूर दिवाळीनंतर वसईच्या शहरी भागाच्या ठिकाणी स्थलांतर करून येतात. या ठिकाणी हाताला मिळेल ती विविध प्रकारची कामे करून वर्षांला कमाई घेऊन पावसाळ्याआधी पुन्हा आपल्या गावी जातात. परंतु यंदाच्या वर्षी मागील काही दिवसांपासून करोना या रोगाने कहर केल्याने संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याने सर्व मिळणारी छोटी-मोठी कामे बंद झाली आहेत. त्यामुळे या मजुरांच्या हाताला काम नसल्याने या नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एरवी हे मजूर हाताला काम मिळावे म्हणून वसईच्या भागातील विविध ठिकाणच्या नाक्यावर येऊन थांबतात. ज्यांना या मजुरांची गरज आहे, ते बांधकाम व्यावसायिक, शेतकरी, भाजी व्यावसायिक, मच्छीमार, इतर नागरिक विविध प्रकारच्या कामासाठी घेऊन जातात. त्यामुळे दिवस मजुरीतून यांची चांगलीच कमाई होत होती. आता मात्र सर्व काही थंडावल्याने हाताला काम नाही जर काम मिळाले नाही तर आम्ही खाणार काय यासाठी पुन्हा आम्ही गावाची वाट पकडली असल्याचे मजुरांनी सांगितले आहे.

अशी ही माणुसकी

मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मागील तीन दिवसांपासून वसई, मुंबईबाहेरील नागरिकांनी आपल्या गावाचा रस्ता धरला आहे त्यामुळे महामार्गावर पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या झुंडीच दिसून येत आहेत. सर्व ठिकाणी बंद असल्याने या नागरिकांना उपाशीपोटी पायी प्रवास करावा लागतो हे लक्षात घेता खनिवडे येथील जुना टोलनाका येथे शिरसाड तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून महामार्गावरील शेजारच्या ग्रामस्थांच्या विशेषत: गृहिणींच्या सहकार्याने चपात्या, भाकऱ्या, भाजी, लोणचे, बिस्कीट, फरसाण, चहा, पाणी यांची व्यवस्था करण्यात आली.

‘रानातील खाद्यावर  तरी पोट भरू !’

सध्या करोनामुळे हातावर कमाई करणाऱ्या मजुरांची बिकट स्थिती झाली आहे. आमच्या हाताला कोणतेच काम मिळत नाही त्यामुळे आमच्या कुटुंबातील सदस्यांचे पोट आम्ही कसे भरणार? जर गावाकडे गेलो तर गावाच्या शेतीत व रानात मिळणाऱ्या विविध फळभाज्या यावर पोट तरी भरेल, असे विक्रमगड येथील शेतमजूर सावजी लहानगे यांनी सांगितले.