वेळेच्या नियोजनात ‘एक तास वाहतूक कोंडीचा’

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर विविध कारणांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने नोकरदार वर्गासह बांधकाम क्षेत्राला हैराण केले असताना आता ठाणे शहरात राहणारे चित्रपट आणि नाटय़ कलाकारही कोंडीच्या त्रासाविषयी समाजमाध्यमांवर संताप व्यक्त करीत आहेत.

सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची आता ‘वाहतूक कोंडीचे शहर’ अशी एक नवी ओळख दृढ होत असून शहरातील दैनंदिन प्रवास जिकरीचा झाल्याची खंत कलाकार व्यक्त करीत आहेत. याशिवाय, शहरातील नागरिकही वाहतुक कोंडीबाबत मीम्स, ट्वीटच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरांच्या वेशीवर गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे. प्रवेशद्वाराजवळील पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. या कोंडीचा परिमाण कोपरी तसेच शहरातील अंतर्गत वाहतुकीवरही होऊ लागला आहे. अशीच अवस्था घोडबंदर मार्गावर आहे. बंदी घातलेल्या वेळेत सुरु असलेली अवजड वाहतुक, महामार्गावर पडलेले खड्डे, टोल नाक्यांवर नियमांची होणारी टोलवाटोलवी इत्यादी कारणांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

नोकरदार वर्गासाठी ही कोंडी नित्याची आहे. हा हैराण झाला आहे. घोडबंदर भागातील कोंडीचा फटका तेथील बांधकाम व्यवसायालाही बसत आहे. त्यापाठोपाठ ठाणे शहरातील चित्रपट आणि नाटय़ कलाकारांना दररोज कामानिमित्त प्रवास करताना कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ते आता समाज माध्यांवर व्यक्त होऊ लागले आहेत. तसेच मुंबई आणि आसपासच्या शहरातील प्रवासासाठी ठाणे तसेच घोडबंदर हा चांगला पर्याय असल्यामुळे अनेक कलाकरांनी या ठिकाणी घरे घेतली आहेत. मात्र, याच शहरातील प्रवास कोंडीमुळे त्रासदायक ठरत असल्याचे कलाकार सांगतात.

कलाकार म्हणतात..

आयुष्यातील मोठा मनस्ताप

ठाण्यातील वाहतूक कोंडी म्हणजे ठाणेकरांच्या आयुष्यातील मोठा मनस्ताप आहे. दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. ती वाढत असली तरी वाहतूक नियोजन मात्र शून्य आहे. जड-अवजड वाहनांना वाहतुकीसाठी वेळ ठरवून दिली असतानाही त्यांचे वाहनचालक  नियम पायदळी तुडवून शहरात दिवसभर ये-जा करतात. जड-अवजड वाहनांचे चालक त्यांची वाहने रस्त्याच्या तीनही मार्गिकांमधून चालवितात. परिणामी, मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ठाण्यातील अमूक एखाद्या ठिकाणी वाहनाने प्रवास करण्यासाठी काही वर्षांपूर्वी एक तास लागत होता. मात्र, आता त्याच ठिकाणी पोहचण्यासाठी तीन तास लागतात. शहराच्या प्रवेशद्वारांवर होणारी वाहतूक कोंडी ही अधिक त्रासदायक आहे. दररोज ठाणे शहरांच्या प्रवेशद्वाराजवळील पथकर नाक्यांवर वाहनांच्या एक किलोमीटपर्यंत रांगा लागतात. शहरातील अनेक रस्त्यांवर पावसामुळे पडलेल्या खड्डय़ांचे कारण पुढे करत वाहतूक कोंडी होत असल्याचे संबंधित विभागांकडून सांगितले जाते. मात्र पावसामुळे दरवर्षी खड्डे पडतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत असेल तर त्यासाठी सुयोग्य नियोजन करणेही आवश्यक आहे. ठाणे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीविषयी संबंधित विभागांना गांभीर्य नसल्याचे दिसते.     – मकरंद अनासपुरे, अभिनेता

 

कलाकारांसाठी डोकेदुखीच

दिवसेंदिवस ठाणे परिसर कोंडीमय होत आहे.  वाहतूक कोंडीने केवळ वेळच नाही तर अनेक गोष्टींचे नुकसान होत आहे. ठाण्यात राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर ही दोन मोठी नाटय़गृहे असून या ठिकाणी नाटय़प्रयोग  होत असतात. नाटकाचा प्रयोग  ८ वाजता असेल तर कोंडीत अडकावले लागू नये म्हणून ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असतानाही २ तास आधीच घरातून निघावे लागते. ठाण्याच्या वेशींवरची वाहतूक कोंडी ही नाटय़रसिकांसह  कलाकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. चित्रपट, नाटय़ आणि संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार मुंबईतून ठाण्याकडे येताना वाहतूक कमी झाल्यानंतरच म्हणजेच रात्री बाराच्या सुमारासच निघतात. मीही मुंबईतली एखादी बैठक साडेसहा वाजता संपली तरी पुढील तीन तास वेळ घालवून वाहतूक कोंडी कमी झाल्याचा अंदाज घेतो आणि रात्री ११ किंवा १२ च्या सुमारास ठाण्याला घरी जाण्यास निघतो.   ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील टोलनाके हे कोंडीमय झाले आहेत. ठाण्याच्या आनंदनगर पथकर नाक्यावर कोंडीमुळे वाहनांची रांग विक्रोळीपर्यंत जाते. ठाण्याच्या बाहेरचा प्रवास करायचा असेल तर टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडीचा एक तास अपेक्षित धरूनच वेळेचे नियोजन करावे लागते.       – रवी जाधव, चित्रपट दिग्दर्शक

नेते शुभेच्छांमध्ये मग्न, जनता मात्र कोंडीत!

विर्लेपार्ले येथे तासाभराची बैठक संपवून बुधवारी सायंकाळी ७.२९ ला ठाण्याच्या दिशेने निघालो. ठाण्यात पोहचण्याची वेळ होती ११.२८ मिनीटे. तब्बल चार तासांचा विलेपार्ले ते ठाणे असा प्रवास झाला. जो एरव्ही एक तासाचा असतो. ठाणेकरांचे हे रोजचेच मरण झाले आहे. मेट्रो आणि सेवा रस्त्यांची एकाचवेळी काढलेली अनियोजित कामे, रस्त्यांना आणि पुलांवर पडलेले अभूतपूर्व खड्डे, सगळे नियम मोडत शहरात कधीही घुसणारी अवजड वाहने आणि या मरणातही ज्यांनी पिवळ्या पट्टय़ाचा नियम कधीच कचरापेटीत फेकला असे टाळूवरचे लोणी खाणारे जाचक पथकर नाके, यांचा त्रास रोज प्रवासात सहन करावा लागतो. आमच्या दुर्दशेची अनेक कारणे आहेत. अशात आमचे सगळे नेते फलक लावून एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात किंवा आम्हा पामरांना सणांच्या शुभेच्छा देण्यात गुंतले आहेत. या राक्षसी कोंडीबद्दल बोलताना कुणीच दिसत नाही. बहुतेक आमच्या रखडलेल्या वाहनांमध्येच एकदिवशी आमची स्मारके उभी राहणार आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांनी समाजमाध्यांवर व्यक्त केली आहे.