ठाणे : करोना रुग्णसंख्या घटू लागल्याने ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरानुसार निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी सकाळी रस्त्यांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाली. खासगी कार्यालये सुरू झाली असली तरी, त्यांना लोकलमधून प्रवासाची मुभा नाही. त्यामुळे नोकरदार वर्गाने स्वत:च्या वाहनाने कार्यालयापर्यंतचा प्रवास केल्याने त्यांच्या वाहनांचा भार रस्त्यांवर वाढला होता. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे-बेलापूर आणि शिळफाटा मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याशिवाय बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेक मार्गांवर कोंडी झाल्याचे दिसून आले.

राज्य शासनाने निर्बंध शिथिल केल्याने ठाणे शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा, खासगी कार्यालये, उद्याने, मॉल, उपाहारगृहे सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली, फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अडविले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. बाजारपेठेत टीएमटी बसगाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या. काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. जांभळीनाका बाजारपेठ, कोर्टनाका, शिवाजी पथ या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा परिणाम ठाणे स्थानकातील वाहतुकीवर झाला. ठाणे स्थानक ते कोर्टनाका या पाच मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना २० ते २५ मिनिटे लागत होती.

ठाणे शहरातील खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने तर मुंबईतील कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना उपनगरीय रेल्वे प्रवासास अद्यापही बंदी आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी ठाणे, घोडबंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ भागांत राहाणाऱ्या नोकरदार वर्गाने मुंबईतील कार्यालये गाठण्यासाठी स्वत:च्या वाहनाने प्रवास केला. एकाच वेळी ही वाहने रस्त्यावर आल्याने पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, शिळफाटा तसेच शहरातील अंतर्गत मार्गांवर कोंडी झाली. १० ते १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागत होता. ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्याही नाकीनऊ आले होते.