कचोरे ते पत्रीपुलाजवळील वळण रस्ता, पदपथांवर फेरीवाल्यांचा अडथळा

कल्याण : कचोरे ते पत्रीपूलदरम्यान चिंचोळ्या वळण रस्त्यावर तसेच पदपथावर या भागातील फेरीवाले हातगाडय़ा लावून व्यवसाय करत असल्यामुळे या संपूर्ण परिसरात कोंडी वाढली आहे. सायंकाळी ४ ते रात्री उशिरापर्यंत हा व्यवसाय चालतो. त्यामुळे डोंबिवलीकडून पत्रीपुलाकडे जाणारी सर्व वाहने हातगाडय़ांच्या अडथळ्यांमुळे अडकून पडत आहेत.

महापालिकेच्या जे प्रभागाच्या अंतर्गत हा परिसर येतो. हा प्रभाग कल्याण पूर्वेतील लोकग्राम भागात आहे. येथील अतिक्रमणविरोधी पथकाला कचोरे ते पत्रीपूलदरम्यान बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करायची असेल तर शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्याने त्यांना तात्काळ  येता येत नाही. मग हे कारवाई पथक टाटा नाका, तिसगाव, बंदिश पॅलेस, ९० फुटी रस्त्याने येऊन चिंचोळ्या रस्त्यात शिरून तेथे कारवाई करतात. जे प्रभाग कार्यालय ते पत्रीपूल कचोरे गल्ली हा रस्ता १० मिनिटांचा आहे. मात्र, वळसा घेऊन जावे लागत असल्याने त्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो.

या रस्त्याला खेटून टेकडी आहे. त्याच्यावर झोपडय़ा आहेत. पाऊस कमी झाल्याने अनेक रहिवाशांनी झोपडय़ा सिमेंट, विटांनी बांधकाम पक्के करण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व बांधकाम साहित्य मुख्य रस्त्याच्या कडेला ठेवतात.   त्यामुळे १० ते १५ फुटाचा कचोरे ते पत्रीपूलदरम्यानचा चिंचोळा रस्ता वाहन ये-जा करण्यासाठी सहा फुटांचा उरतो. या रस्त्यावरून ठाकुर्ली, डोंबिवलीतून ९० फुटी रस्त्याने येणारी वाहने, टाटा नाका भागातून खंबाळपाडा झोपु योजना रस्त्याने येणारी वाहने पत्रीपुलाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. एकाच वेळी ही वाहने चिंचोळ्या रस्त्यावर येत असल्याने या भागात दररोज संध्याकाळी ४ वाजल्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस पत्रीपुलावरील वाहनांचे नियोजन करीत असल्याने ते चिंचोळ्यावर रस्त्यावर काय चालले आहे याकडे लक्ष देत नाहीत. पालिकेचे कारवाई पथक पत्रीपुलाजवळील वाहतूक कोंडीमुळे रस्ता ओलांडून तात्काळ घटनास्थळी येऊ शकत नाही याची जाणीव असल्याने फेरीवाले राजरोसपणे या भागात रस्ता अडवून व्यवसाय करतात.