शासनाच्या अभियोग संचालनालयाच्या संचालकांनी राज्यातील नऊ अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांना एका आदेशाने सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता गट ‘अ’ पदी बढती दिली आहे. या यादीमध्ये ठाण्यातील अशोक खामकर, दीपककुमार मिश्रा या दोन अतिरिक्त सरकारी वकिलांचा समावेश आहे.

खामकर, मिश्रा हे ठाणे परिक्षेत्रात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम पाहत होते. त्यांचा विभागीय संवर्ग हा अनुक्रमे पुणे आणि औरंगाबाद आहे. खामकर यांना अभियोग संचालनालयाने सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्तापदी बढती दिली आहे. त्यांची नेमणूक सातारा येथे करण्यात आली आहे. दीपककुमार मिश्रा यांना सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता पदी बढती देऊन, जालना येथे नेमणूक देण्यात आली आहे.

याशिवाय सतीश कुलकर्णी (मुंबई -नेमणुकीचे ठिकाण),  सुरेंद्रप्रसाद तिवारी (अकोला), अशोक देशमुख (जळगाव), जीवन चव्हाण (परभणी), अशोक जोशी (पुणे), सुनील गुजराथी (नंदुरबार), गणेश देहडराय (अलिबाग) यांच्या सरकारी अभियोक्ता म्हणून बढतीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.