१५ दिवसांत कारखाने बंद करण्याचे आदेश; वालधुनी नदी प्रदूषित करत असल्याचा ठपका

मोठमोठय़ा परदेशी ब्रॅण्डच्या नावांची हुबेहूब नक्कल करून तयार केलेल्या जीन पँट अतिशय स्वस्त दरांत विक्री करणाऱ्या उल्हासनगरमधील जीन्स उद्योग आता गुंडाळला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील वालधुनी आणि उल्हास नदीच्या प्रदूषणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर उल्हासनगमधील जीन्सनिर्मिती कारखाने अन्यत्र हलवण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. येत्या १५ दिवसांत जीन्सनिर्मिती कारखाने बंद न केल्यास एक डिसेंबरपासून वीज-पाणी तोडून या कंपन्या जमीनदोस्त करण्यात येतील, असा इशारा उल्हासनगरच्या महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

उल्हासनगरमधील स्वस्त जीन्सना भरपूर मागणी असली तरी, या उद्योगामुळे वालधुनी नदीची पुरती वाताहत झाली आहे. जीन्स कारखान्यांमध्ये रंगकामाच्या प्रक्रियेतून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता वालधुनी नदीत सोडण्यात येते. उल्हासनगर कॅम्प पाचमध्ये जवळपास साडेपाचशेहून अधिक जीन्स कारखाने आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रासायनिक सांडपाणी वालधुनी नदीत सोडले जात असल्याने येथे मोठे जलप्रदूषण झाले आहे. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकार यांचे कान उपटल्यानंतर आता महापालिकेने कठोर पावले उचलली आहे.

कॅम्प पाचमधील सर्व जीन्सनिर्मिती कारखाने सांडपाणी प्रक्रिया केंद्राजवळ हलवण्याचे आदेश पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिले आहेत. यासाठी कारखानदारांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आयुक्तांनी येत्या २१ नोव्हेंबरला जीन्स वॉशचा उद्योग करणाऱ्या कारखानदारांची टाऊन हॉल येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत जीन्स कारखानदारांनी स्वत:च त्यांचे काम बंद करून सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी कारखाने स्थलांतरित करावेत, अशी सूचना आयुक्त करणार आहेत. त्यानंतरही कारखाने तेथून न हलल्यास १ डिसेंबरपासून महापालिका

प्रशासन त्यांचे पाणी तोडणार आहेत. तसेच वीज मंडळामार्फत वीजजोडणी कापण्यात येणार आहे. त्यानंतरही कारखाने सुरू राहिल्यास कारखान्यांची बांधकामे अनधिकृत असल्याने त्यांच्यावर बुलडोजर फिरविण्यात

येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.