सुभाष मैदान, कल्याण
कल्याण शहरातील एकमेव भव्य मैदान म्हणून सुभाष मैदानाकडे पाहिले जाते. शहरातील हा सर्वात मोठा मॉर्निग स्पॉट आहे. या मैदानाला नागरिकांची पसंती आहे. विस्तृत जॉगिंग ट्रॅक, झाडांची सावली आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडणारी मंडळी या सगळ्यांनी गजबजलेले हे मैदान म्हणजे कल्याण शहराचे क्रीडावैभवच आहे. लहान शाळकरी मुलांपासून ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंपर्यंत सगळ्यांच्या हक्काचे ठिकाण म्हणजे कल्याणचे सुभाष मैदान. सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आदी भारतीय संघातील अनेक मान्यवरांनी आपल्या बॅटची जादू या मैदानामध्येही दाखवून दिली आहे. कल्याणच्या क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक घटनेचा साक्षीदार ठरलेले हे मैदान खेळाडूंप्रमाणेच सामान्य नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. इथे येणाऱ्या प्रत्येकाला व्यायाम आणि क्रीडा क्षेत्राची ओढ लागल्याशिवाय राहत नाही. मात्र महापालिकेची अनास्था, दारुडे, गर्दुल्ल्यांचा विळखा, अस्वच्छता, अतिक्रमणे अशा अव्यवस्थांच्या कोंडाळ्यामध्ये अडकलेल्या सुभाष मैदानामध्ये खेळणे तसेच मॉर्निग वॉक करणे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे ठरले आहे.
कल्याण शहरामध्ये नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी उपलब्ध मोजक्या ठिकाणांमध्ये सुभाष मैदानाचे नाव आवर्जून घेतले जाते. सकाळी चालण्यासाठी येणारे नागरिक, खेळाचे सराव करणारे क्रीडापटू, दिवसभर वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आणि सराव, तर सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या मैफलीचे ठिकाण अशा सगळ्या गोष्टींची दिवसभर सुभाष मैदानामध्ये रेलचेल असते. सकाळच्या वेळी परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणामध्ये या भागात हजेरी लावतात. जॉगिंग ट्रॅकवरून चालणे, धावणे सुरू असते, तर कुठे योग, प्राणायाम करणारे ज्येष्ठ नागरिक आढळतात. एका बाजूला क्रिकेट, गोळाफेक, अॅथलेटिक्सचा सराव खेळाडू करीत असतात, तर दुसरीकडे पोलीस विभागामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांचाही सराव सुरू असतो. सुभाष मैदानालगत असलेल्या झुंजारराव उद्यानामध्ये नक्षत्र उद्यान उभारण्यात आले असून तिथे ज्येष्ठ नागरिक बसतात. बाजूला असलेल्या खेळाच्या साहित्यावर लहान मुलांचा सराव सुरू असतो. एकूणच व्यायामासाठी आसुसलेले आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक तरुणाई या मैदानावर मोठय़ा प्रमाणात घाम गाळताना दिसून येते.
सुभाष मैदानातील समस्यांची दाटी
- मैदानावर कोणत्याही प्रकारची नियमावली नसल्याने मनमानी पद्धतीने सराव केला जात असून त्यामुळे मैदानावर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी मैदान उंचसखल बनले आहे, तर हिरवळीचा पट्टाही नष्ट झाला आहे.
- जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था होऊन त्यावर मातीचे थर वाढू लागले आहेत. अनेक जण मैदानामध्ये वाहने घुसवत असल्याने त्याचाही फटका बसतो.
- भिकारी, गर्दुल्ले आणि दारुडय़ांचा विळखा या मैदानाला बसला असून सुरक्षारक्षक नसल्याने त्यांचा नागरिकांना त्रास होतो.
- खेळाच्या साहित्यांची दुर्दशा उडाली असून अनेक खेळणी तुटली आहेत.
नागरिकांच्या अपेक्षा
- मैदानाचे सुशोभीकरण करून देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात यावीत.
- चालण्याच्या वेळेपूर्वी स्वच्छतेची कामे पूर्ण केली जावीत.
- सुमधुर संगीत वाजवले जावे.
- खुल्या व्यायामशाळेची उभारणी करावी
- सुरक्षारक्षक, माळी आणि कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करून त्यांच्याकडून नियमित देखभाल राखण्यात यावी.
- मैदानामध्ये येणाऱ्या वाहनांना र्निबध घालावा.ह्ण
अनुभवाचे बोल..
नुकसान करणारी अव्यवस्था
कल्याण शहरातील एकमेव मैदान म्हणून गेल्या १५ वर्षांपासून आमचा या ठिकाणी सराव सुरू आहे. सुरुवातीला अत्यंत सपाट आणि हिरवळीने बहरलेले हे मैदान सध्या धुळीने माखलेले असून येथील काही मंडळी मैदानाच्या दुर्दशेस हातभार लावत आहेत. त्यामुळे मैदानाचा सपाटपणा जाऊन त्यावर खड्डे पडू लागले आहेत. एकमेकांना साहाय्य करण्यापेक्षा प्रत्येक अॅकॅडमी आणि संस्था एकमेकांना त्रास देण्यासाठीच प्रयत्न करतात. त्यामुळे सुभाष मैदानामध्ये येणाऱ्या धावपटूंना त्रासाचा सामना करावा लागतो.
– शोभा देसाई, धावपटू
परिस्थिती बदलण्याची गरज..
एके काळी अत्यंत दर्जेदार मैदान म्हणून ओळख असलेल्या सुभाष मैदानाची राजकीय अनास्थेमुळे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे कल्याणमधील हे अत्यंत उपयुक्त मैदान नष्ट होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे. रात्रीच्या वेळी या मैदानाचा ताबा दारुडे घेतात. दारू पिऊन ते इथेच बाटल्या फेकतात. त्याचप्रमाणे मैदानात आता अतिक्रमण होऊ लागले आहे. प्रेक्षागृहाची दुर्दशा उडाली आहे. येथील कामगार मैदानाची निगा राखण्यासाठी चक्क पैशांची मागणी करतात.
– बाळ सोनावणे
मैदानाची रया गेली..
शहरातील पहिला मॉर्निग स्पॉट म्हणून सुभाष मैदानाची ओळख असून पूर्वी येथे सकाळी चालण्यासाठी येणाऱ्यांचे मन प्रसन्न करण्यासाठी सुगम संगीत वाजवले जात होते. मात्र ही यंत्रणा आता पूर्णपणे बंद पडली असून मैदानाची दुर्दशा होऊ लागली आहे. त्यामुळे सुभाष मैदानामध्ये पूर्वी मोठय़ा संख्येने येणारे नागरिक आता या भागात फिरकत नाहीत. सकाळच्या चालण्याच्या वेळीच सफाई कामगारांचे स्वच्छतेचे काम सुरू असते. त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात धुळीचे लोट उडत असतात. संध्याकाळी दारुडे, गर्दुल्ले आणि समाजकंटकांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सुभाष मैदानाची मॉर्निग स्पॉट म्हणून असलेली ओळख आता हरवू लागली आहे.
– जयकुमार शहा, ज्येष्ठ नागरिक
महापालिकेने लक्ष देण्याची गरज..
महापालिकेपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असूनही या मैदानाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून नक्षत्र उद्यानाची दुरवस्था झाली आहे. नगरसेवक, आमदार निधी देऊन परिस्थिती बदलण्याचे आश्वासन देतात. मात्र त्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. प्रत्यक्षात मैदानाची परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. सुरक्षारक्षक, माळी आणि मैदानाची निगा राखणाऱ्या मंडळींची नियुक्ती महापालिका प्रशासनाने करणे गरजेचे आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. मैदानामध्ये मातीचे ढिगारे टाकण्यात आले असून त्याला क्षेपणभूमीची अवकळा प्राप्त झाली आहे. येथे नागरिकांचा ओघ वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष लक्ष देण्याची गरज आहे.
– वामनराव बहाळकर
सराव करणाऱ्या खेळाडू मुलींची कुचंबणा..
सुभाष मैदानावर दिवसभर मुलींचा आणि महिलांचा खेळासाठी मोठा राबता असतो. मात्र येथे कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही, स्वच्छतागृह नाही. त्यामुळे मुलींची मोठय़ा प्रमाणात कुचंबणा होते. अनेकदा तर त्यांना उघडय़ावर कपडे बदलावे लागतात. पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहासाठी त्यांना महापालिकेचे कार्यालय गाठावे लागते. या समस्यांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
– ज्योती शर्मा, महिला प्रशिक्षक