वसईतील विजेचा खेळखंडोबा ग्राहकांसाठी नेहमीचेच शुक्लकाष्ठ बनले असताना महावितरणच्या सदोष कारभाराचा ग्राहकांना आता आणखी जाच होऊ लागला आहे. वीजवितरण विभागातील सदोष मीटर आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे वसईत अनेक ग्राहकांना हजारो रुपयांची वीज बिले पाठवण्यात आली आहेत. आडणे गावातील अनिल धुळे यांना तर तब्बल एक लाख १३ हजार रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
वसईत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. अशातच आता वीज बिलांनीही ग्राहकांना जेरीस आणले आहे. अनेक ग्राहकांना लाखाच्या घरात वीज बिले येऊ लागल्याने त्यांची झोप उडाली आहे. पारोळ गावातील नरेश मारवाडी यांना १ लाख रुपये तर विजय भोईर यांना ५५ हजारांचे वीज बिल आले आहे. आडणे गावातील अनिल धुळे यांना १ लाख १३ हजार तर माजवी गावातील सुरेश चोघला यांना ८८ हजार रुपयांचे वीज बिल आलेले आहे या शिवाय अनेक ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना २० हजारांपासून ७० हजार रुपयांचे वीज बिल आलेले आहे.
माजीवली गावातील एका आदिवासी पाडय़ात खंडेराव लहांगे या आदिवासीच्या एक दिवा असणाऱ्या झोपडीत साडेसात हजार रुपयांचे वीज बिल आलेले आहे. यामुळे ग्राहक हवालदिल झालेले आहे. अशी वाढीव बिले कमी करण्यासाठी त्यांना वितरण विभागाच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. अनेकांच्या वीज बिलात वाढ झालेली असली तरी ती फार मोठी नाही. त्यामुळे वितरण विभाग त्यांना ती रक्कम कमी करून देत नाही. यामुळे वितरण विभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, ‘सदोष मीटर आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे काही ग्राहकांना वाढीव बिले गेली होती. परंतु ती तात्काळ दुरुस्त करून दिली जात आहेत. वाढीव बिलाच्या तक्रारी आता राहिलेल्या नाहीत,’ असे स्पष्टीकरण महावितरणच्या वसई विभागातील अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे यांनी दिले आहे.