किरकोळ मंडईत १५ ते ४० रुपयांनी महागाई

ठाणे : गेल्या दोन आठवडय़ांपासूनच्या स्वस्ताईमुळे मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीच्या आठवडय़ात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारे भाजीदर आता पुन्हा उसळी घेऊ लागले आहेत. मार्गशीर्षमध्ये मागणी वाढू लागल्याने भाज्यांचे दर वाढू लागले असून किरकोळ बाजारात १५ ते ४० रुपयांनी भाज्या महागल्या आहेत.

ठाणे शहरात दोन आठवडय़ांपूर्वी भाज्यांचे दर वाढले होते. मात्र त्यानंतर भाज्यांचे दर पुन्हा कमी झाल्याचे चित्र होते. मार्गशीर्ष महिन्यात अनेकजण उपवास ठेवतात आणि या महिन्यात मांसाहार करत नाहीत. यामुळे या महिन्यात भाज्यांची मागणी वाढते. या महिन्यात सुरुवातीला भाज्या स्वस्त झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दहा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात २८ रुपये किलोने विकली जाणारी भेंडी सध्या ४० रुपये किलोने विकली जात आहे. ४० रुपये किलोने विकली जाणारी गवार आता ६० रुपयांना विकली जात आहे. तर, ३५ रुपये किलोने विकली जाणारी फरसबी सध्या ५५ रुपये किलोने विकली जात आहे. तसेच १२ रुपये किलोने विकली जाणारी वांगी आणि १० रुपये किलोने विकला जाणारा फ्लॉवर सध्या १४ रुपये किलोने विकला जात आहे. त्याचबरोबर, किरकोळ बाजारातही दहा दिवसांपूर्वी ४० ते ५० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या भेंडी, गवार आणि फरसबी या भाज्या सद्य:स्थितीला ८० रुपये प्रति किलोने विकल्या जात आहेत.

मार्गर्शीष महिन्यात भाज्यांची मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली असली तरी, पुणे, नाशिक जिल्ह्य़ातून कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्या येतात त्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.

सुनील सिंगतकर, उपसचिव, भाजी बाजार, एपीएमसी, वाशी.