|| पूर्वा साडविलकर

चक्रीवादळामुळे आवक घटली; इंधन दरवाढीचाही फटका

 

ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई महानगर परिसराला होणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटल्याने काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यात आता इंधन दरवाढीची भर पडल्याने ग्राहकांना चढ्या दराने भाज्यांची खरेदी करावी लागत आहे.

करोना निर्बंधामुळे पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांतून मुंबई महानगर क्षेत्रात भाजीपाल्याची आवक घटली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे आवक आणखी कमी झाली. त्यातच इंधनाचे दर वाढत असल्याने भाज्यांच्या घाऊक आणि किरकोळ दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून मिळालेल्या माहितीनुसार घाऊक बाजारात प्रमुख भाज्यांच्या किमती किलोमागे चार रुपयांपासून थेट २० रुपयांपर्यत वधारल्या. घाऊक बाजारात वाढ होताच किरकोळीतही भाववाढ झाली. घाऊक बाजारात आठवड्याभरापूर्वी ३६ रुपये प्रतिकिलोने विकली जाणारी उत्तम प्रतीची भेंडी सध्या ४६ रुपये प्रतिकिलो दराने मिळत असून १४ रूपये प्रतिकिलोने विकल्या जाणाऱ्या दुधी भोपळ्याचा दर २८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. २८ रुपये प्रतिकिलोने विकल्या जाणाऱ्या चवळीच्या शेंगांचा दर ४० रुपयांवर गेला आहे. वाटाणा आणि तोंडलीच्या दरातही १५ रुपयांनी वाढ झाली आहे.

उत्तम प्रतीची तोंडली किलोमागे ५० रुपये तर वाटाणा ८५ रुपयांनी विकला जात आहे. काही भाज्यांचे दर मे महिन्यात चढेच असतात. यंदा वादळ आणि इंधन दरवाढीच्या दुहेरी फटक्यामुळे ही भाववाढ अधिक आहे, अशी माहिती  घाऊक भाजी विक्रेते हेमंत काळे यांनी दिली. वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्वी दररोज भाज्यांच्या ६०० ते ६५० गाड्या दाखल होत होत्या. गेल्या काही दिवसांपासून ४०० ते ४५० गाड्या दाखल होत आहेत, अशी माहिती बाजार समितीतील एका  वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

महागाईचे चटके... खाद्यतेलांच्या किमतीत ११ वर्षांतील उच्चांकी वाढ नोंदवली गेली असतानाच वाहतुकीचा खर्च वाढल्याने भाज्यांचे दर ४० ते ५० टक्क्यांनी वधारले आहेत. डाळींच्या किमती अजूनही उतरण्याची चिन्हे नाहीत. आठवड्याभरापासून अंडीही महाग झाल्याने सामान्यांची चहुबाजूंनी कोंडी झाली आहे.

 

तौक्ते चक्रीवादळापाठोपाठ इंधनदरवाढीचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. वादळामुळे भाज्यांची आवक कमी होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्यामुळे भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. – सुनिल सिंगतकर, उपसचिव, भाजीपाला मार्केट, वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती

 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी, भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. – दत्ता धुमाळ, कार्याध्यक्ष, माथाडी कामगार टेम्पो असोसिएशन, वाशी

चक्रीवादळामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांची आवक घटली आहे. त्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाली. चक्रीवादळासह आता इंधन दरवाढीमुळे भाज्या महागल्या आहेत. गेल्या काही दिवसांत भाज्यांच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. – कैलास ताजणे, अध्यक्ष, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ