मुखपट्ट्यांचा वापर न करणाऱ्या    प्रवाशांवर कारवाई; तीन लाखांचा दंड वसूल

विरार : करोना  महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने अटी-शर्ती ठेवत सामान्य नागरिकांसाठी लोकल रेल्वेसेवा सुरू केली आहे. यात मुखपट्ट्या परिधान करणे बंधनकारक आहे., असे असतानाही काही प्रवासी या नियमांचे उल्लंघन करताना आढळून येत आहे. अशा प्रवाशांवर कारवाईची मोहीम रेल्वे पोलिसांनी सुरू केली आहे. मागील २० दिवसांत दोन हजार प्रवाशांवर कारवाई करत तीन लाख रुपयांहून अधिक दंडवसुली करण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत लोकलसेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते.  प्रादुभाव  कमी होत गेला तशी टाळेबंदीतही शिथिलता आणली गेली. सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली.  परंतु सामान्य नागरिक पुन्हा एकदा त्यापासून वंचित राहिले.  पुढे रुग्णसंख्याही कमी दिसू लागल्याने मुख्यंत्र्यांनी वेळेचे बंधन तसेच नियमांचे पालन करण्याचा सूचना देऊन  सर्वसामान्यांसाठीही लोकल रेल्वेसेवा सुरू केली आहे.  त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक वर्गाला दिलासा मिळाला आहे.

पण रोजची वाढती गर्दी करोना महामारीला पुन्हा आमंत्रण देऊ लागली आहे. त्यात मुखपट्ट्या बंधनकारक असतानाही काही प्रवासी विनामुखपट्ट्या प्रवास करत असल्याचे दिसू लागले आहेत. यामुळे इतर नागरिकांनासुद्धा करोना प्रादुर्भावाचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होऊ लागली. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

२२०० प्रवाशांवर कारवाई

विरार ते चर्चगेट दरम्यान मागील २१ दिवसांत रेल्वेने २२०० प्रवाशांवर कारवाई करत तीन लाख २१ हजार रुपये दंडवसुली केली. रेल्वे स्थानकाच्या आवारात आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ही सातत्याने सुरु राहणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले.  रेल्वे पोलीस आणि महानगरपालिका मार्शल यांच्यामार्फत ही कारवाई केली जात आहे.