News Flash

रेल्वेचा पाणीपुरवठा पालिकेकडून खंडित

महापालिकेचा तब्बल ६८ लाख रुपयांचा सेवा कर तसेच ११ लाख रुपयांची पाणी कराची रक्कम थकवली आहे.

६८ लाख रुपयांचा सेवाकर, ११ लाख रुपयांची पाणीपट्टी थकवली

पश्चिम रेल्वेने वसई-विरार महापालिकेचा तब्बल ६८ लाख रुपयांचा सेवा कर तसेच ११ लाख रुपयांची पाणी कराची रक्कम थकवली आहे. गेल्या १६ वर्षांपासून रेल्वेने पालिकेकडे या रकमेचा भरणा केलेला नाही. त्यामुळे ही रक्कम न भरल्यास रेल्वेच्या इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे पत्र पालिकेने रेल्वेला दिले आहे.

पश्चिम रेल्वेच्या वसईच्या नवघर येथे १३ रहिवासी इमारती आहेत. या इमारतींमध्ये रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी राहत आहेत. रेल्वे ही सरकारी संस्था असल्याने पालिका त्यांच्याकडून सेवा कर वसूल करते. परंतु २००१ पासून रेल्वेने या इमारतींचा सेवा कर थकवलेला आहे. या थकवलेल्या सेवा कराची रक्कम तब्बल ६८ लाख २३ हजार रुपये एवढी झालेली आहे. याशिवाय २०१० तसेच २०१५ या वर्षांची पाणीपट्टी अद्याप भरलेली नाही. ती रक्कम ११ लाखांची आहे. पालिका दर वर्षी रेल्वेला थकबाकी भरण्याविषयी पत्र आणि नोटिसा देत असते. मात्र रेल्वेने अद्याप रक्कम भरलेली नाही. यामुळे पालिकेने रेल्वेच्या व्यवस्थापकांना जर त्वरित भरणा केली नाही तर या सर्व इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले आहे.

याबाबत बोलताना ‘एच’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश घरत यांनी सांगितले की, आम्ही रेल्वेकडे वारंवार पाठपुरावा करीत होतो. पण रेल्वे प्रतिसाद देत नव्हती. न्यायालयात खटला प्रलंबित आहे एवढेच कारण देण्यात येत होते, परंतु कसला खटला त्याचे कागदपत्र सादर केले नाही. त्यामुळे आम्ही पैशांचा भरणा झाला नाही की पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:22 am

Web Title: vvmc cut railway water connection 2
Next Stories
1 आज ठाण्यात ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’
2 पार्किंगच्या नावाखाली लूट
3 धर्मवीरांच्या उद्यानात कचऱ्याचा ढीग
Just Now!
X