वाढीव पुरवठय़ाच्या श्रेयावरून शिवसेना आमदार, उपमहापौरांमध्ये वाद

ठाणे महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा शहरात उन्हाळ्यात तर येथील पाणी प्रश्न अधिकच गंभीर होतो. त्यामुळे दिवा शहरासाठी बारवी धरणातून प्रतिदिन दहा दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा करण्याचे आदेश जलसंपदामंत्र्यांनी दिले. त्यानुसार गेल्या मंगळवारपासून दिवा शहरात वाढीव पाणीपुरवठा सुरूही झाला. मात्र या वाढीव पाण्याच्या श्रेयावरून सध्या दिव्यातील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार आणि उपमहापौरांमध्ये वाद रंगला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे व ठाणे महापालिकेतील दिवा शहरात मोठय़ा प्रमाणात नागरिकरण झाले. मात्र त्यानुसार शहराचे नियोजन झाले नाही. शहराचे नियोजनच फसल्याने येथील नागरिक पायाभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. दिवा शहरात ८० टक्के बांधकामे ही अनधिकृत असून या बांधकामांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्याच नाहीत. पाण्याच्या मुख्य वाहिनीवरून चोरून काही नागरिक पाण्याची चोरी करतात. वर्षांनुवर्षे हा प्रकार सुरूअसून त्याला कुणीही आळा घातलेला नाही. गेल्या निवडणुकीत दिव्यातील प्रभाग वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांना दिव्यातील समस्यांचा पुळका आला. सत्ताधारी शिवसेनेने दिव्याला उपमहापौर पद बहाल करीत आपण दिव्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वाढीव पाणीपुरवठय़ाचा निर्णय झाला. उपमहापौर रमाकांत मढवी वाढीव पाणीपुरवठय़ाचे स्वागत केले, मात्र जलपूजनाच्या कार्यक्रमात आमदार सुभाष भोईर यांना डावलले. त्यामुळे भोईर समर्थक नाराज झाल्याचे समजते. या संदर्भात समाजमाध्यमातून ‘आयत्या बिळावर नागोबा’ यांसारखी शेरेबाजीही करण्यात आली.

भूमिपुत्र असल्याने दिवा विभागाला वाढीव पाणीपुरवठा व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पालकमंत्री, जलसंपदामंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दिव्याला १० दशलक्ष लिटर्स वाढीव पाणी मिळाले. मात्र आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम काही लोक करीत आहेत. त्यांनी आधी काम करावे, मगच त्याचे श्रेय घेण्याचा विचार करावा.

सुभाष भोईर, आमदार

दिवा शहराला वाढीव पाणी मिळाले असून सध्या ज्या जुन्या वाहिन्या आहेत, त्याद्वारे हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जुन्या वाहिन्यांना काही ठिकाणी गळती असून त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. नव्या जलवाहिन्यांसाठी ५० ते ६० लाख रुपयांचा नवा आराखडा तयार करण्यात आला असून त्याही दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांची या पाणी समस्येतून लवकरच सुटका होईल. दिव्याचे नागरिक सुजाण आहेत. त्यांना सत्यस्थिती माहीत आहे.

रमाकांत मढवी, उपमहापौर, ठाणे महापालिका