बारवी, भातसा, आंध्रा धरणांतील जलसाठय़ात चांगली वाढ

ठाणे : ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्य़ातील धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू झाला असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठय़ात वाढ होत असल्याचे चित्र आहे. बारवी धरण ३८.८९ टक्के, भातसा धरण ३८.७२ टक्के तर आंध्रा धरण ३३.०४ टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने चार दिवसांत बारवी धरणक्षेत्रातील पाणीसाठय़ात १६ टक्क्यांनी तर भातसामध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणक्षेत्रातील पाणीसाठय़ात वाढ होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ात पाऊस पुन्हा सुरू झाला असून शनिवारपासून जिल्ह्य़ात पावसाने जोर धरला आहे. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्य़ातील धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे धरणक्षेत्रातील पाणी साठय़ात वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्य़ावरील पाणीटंचाईचे संकट लवकरच दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सद्य:स्थितीत बारवी धरणात ९०.६४ दशलक्ष घनमीेटर, भातसा धरणात ३६४.७९ दशलक्ष घनमीटर आणि आंध्रा धरणात ११२.७९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. सोमवारी बारवी धरणक्षेत्रात १९ मीमी, भातसा धरणक्षेत्रात ३५ मीमी आणि आंध्रा धरणक्षेत्रात ४६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. असे असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे.

धरणांतील जलस्थिती (टक्क्यांत)

धरण   २७ जून १ जुलै  ३ जुलै  ८ जुलै

बारवी   १३.८७  १८.५९  २२.४३  ३८.८९

भातसा  २२.१२  २५.०५  २७.८५  ३८.७२

आंध्रा   २०.४०  २२.५६  २४.९५  ३३.०४