औद्योगिक विकास महामंडळाने ६० टक्के पाणी कपात केल्याने रहिवाशांमध्ये चिंता

पावसाळा लांबण्याची चिन्हे दिसू लागल्याने २७ गावांमधील रहिवाशी चिंतातुर बनले असून येथील काही भागांमध्ये पाणी कपातीत वाढ झाल्याचा दावा रहिवाशांकडून केला जात आहे. २७ गावांसाठी पाण्याचा वाढीव कोटा मिळाल्याची घोषणा केवळ कागदावर असून प्रत्यक्षात टंचाईच्या तासांमध्ये वाढ झाल्याची ओरड गावकरी करू लागले आहेत. येत्या काही दिवसांत  पाऊस पडला नाही तर पाणी कपातीची भीती आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना अजूनही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. बारवी धरणातील पाणी साठा कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून या गावांमधील पाणी पुरवठय़ात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ६० टक्के कपात केली आहे. यामुळे गावक ऱ्यांचे पाण्याअभावी आतोनात हाल  होत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी टँकर येण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. गावांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी मंगळवारी प्रेमा म्हात्रे, आशालता बाबर, रवि म्हात्रे, योगेश म्हात्रे, प्रमिला पाटील यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी महापौर राजेंद्र देवळेकर व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपले गाऱ्हाणे मांडले.एप्रिल मे महिन्यात अनेक नागरिक गावी जातात परंतु आता शाळा सुरू होत असून नागरिक आपआपल्या घरी परतले आहेत. यामुळे पुन्हा एकदा गावात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पालिका प्रशासनाची ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारी  यंत्रणा तसेच  पुरवठय़ाची तांत्रिक समस्येमुळे पाण्याचा कोटा वाढविणे शक्य नाही.

पाणी शहराकडे वळविल्याने संतापाची भावना

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाण्याची टंचाई पाहाता शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिकेला अतिरिक्त पाण्याची घोषणा मध्यंतरी झाली होती. आंद्र धरणातून २५ एमएलडी, भातसा धरणातून ५ एमएलडी व पाली भुतावली धरणातून ५० एमएलडी अतिरिक्त पाणी महापालिकेला देण्यात येणार आहे. पाली भुतावली धरणातील २० एमएलडी पाणी २७ गावांना पुरविले जावे, असे आदेश पाटबंधारे विभागास देण्यात आले आहेत. मात्र, महापालिका मिळालेले वाढीव पाणी शहराला पुरवीत असल्यामुळे ग्रामीण भागात तीव्र संतापाची भावना आहे.