ठाणे, डोंबिवली, नवी मुंबईतील बाजारांना चांगला प्रतिसाद; ११ हजार मेट्रिक टन भाजीपाल्याची विक्री

शेतातला माल माफक दरात ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकारने आणलेल्या आठवडा बाजार योजनेला ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या पणन विभागाने ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या शहरांत सुरू केलेल्या आठवडा बाजारांत आतापर्यंत ११ हजार ३६३ मेट्रिक टन भाजीपाल्याची विक्री झाल्याचा दावा करण्यात येत आहे. हाच धागा पकडून आता ठाणे, डोंबिवली तसेच नवी मुंबईमध्ये आणखी आठवडा बाजार सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शासनाने फळे आणि भाजीपाला बाजार समित्यांच्या अधिकारातून नियंत्रणमुक्त करत आठवडा बाजारांची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरास प्रामुख्याने पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून भाजीपाल्याची आवक होत असते.

या ठिकाणी कार्यरत असलेल्या शेतकरी गटांकडून या आठवडा बाजारात भाज्यांची विक्री व्हावी यासाठी ही योजना आखण्यात आली असून ठाणे जिल्ह्य़ात वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू असलेल्या या बाजारांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्य:स्थितीत ठाणे शहरात दहा ठिकाणी असे आठवडा बाजार सुरू आहेत. ठाणे पालिकेने या आठवडा बाजारांसाठी शहरातील २० जागा जिल्हा पणन विभागाकडे दिल्या आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेकडून या बाजारासाठी १३ जागा सुचविल्या असून त्यापैकी तीन ठिकाणी आठवडा बाजार सुरू आहेत.

नवी मुंबई पालिकेतर्फे सुचविलेल्या जागेपैकी वाशीत सात ठिकाणी आठवडा बाजार सुरू आहेत. तसेच मीरा भाईंदर शहरात दोन ठिकाणी आठवडा बाजारातून शेतमालाची थेट विक्री सुरू आहे. या सर्व शहरांचा आवाका लक्षात घेता अधिक प्रमाणात आठवडा बाजार सुरू करण्याची संधी असली तरी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या बाजारांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वाशी येथील बडय़ा गृहसंकुलाशेजारी हे आठवडा बाजार भरवण्यात येत असून यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पालेभाज्या, भेंडी, गवार या भाज्यांना जास्त मागणी आहे.

नव्या बाजारांचे नियोजन

ठाणे शहरात सुरू असलेल्या दहा बाजारांना ग्राहकांची चांगली मागणी आहे. हे लक्षात घेऊन घोडबंदर पट्टय़ात कोलबाड तसेच पूर्व द्रुतगती महामार्गालगत रघुनाथनगर (राम मराठे रंगमंच) या ठिकाणी आठवडय़ाच्या सोमवारी असे बाजार सुरू करण्याचा निर्णय पणन विभागाने घेतला आहे. याशिवाय डोंबिवलीतील सुनील नगर, पेंढारकर महाविद्यालयाच्या शेजारी असे बाजार सुरू केले जाणार असून नवी मुंबईत सीवूड, नेरुळ या उपनगरांमध्येही बाजार सुरू करण्यासंबंधी चाचपणी सुरू असल्याचे समजते.

सध्या सुरू असलेल्या आठवडा बाजारांना मोठय़ा गृहसंकुल परिसरात जास्त मागणी आहे. शेतकऱ्यांचा थेट माल स्वस्त दरात मिळत असल्याने नागरिक या आठवडा बाजारात येत असतात. भेंडी, गवार आणि पालेभाज्या याला ग्राहकांची जास्त मागणी आहे.

– मोहन गंभीरराव, जिल्हा पणन व्यवस्थापक