२४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४० वाजता उल्हासनगरजवळील हिललाइन पोलीस ठाण्याचा दूरध्वनी खणखणला. ठाणे अंमलदार ए. जाधव यांनी तो फोन उचलला आणि फोन ठेवताच क्षणी तातडीने कल्याण ग्रामीण भागातील नेवाळी गावातील पोलीस चौकीत फोन लावला. कारण, जाधव यांना कल्याण नियंत्रण कक्षातून नेवाळी येथे गवतात एक इसम जखमी अवस्थेत पडल्याचा फोन आला होता. त्यामुळे त्यांनी तातडीने पुढील हालचाल केली. जाधवांच्या फोनने नेवाळी पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक एस. अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेवाळी गावात धाव घेतली. या गाव परिसरातील आकृती चाळीपासून १५० फूट अंतरावर गवतात एक इसम गळा चिरलेल्या अवस्थेत पडला होता. पोलिसांनी या इसमाला गावात कुणी व आजूबाजूच्या रहिवाशांनी यापूर्वी पाहिले होते का, अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. आकृती चाळीतल्या रहिवाशांनी या इसमाला ओळखले. अचंबित व भयभीत झालेल्या या लोकांनी या इसमाचे नाव संजय प्रभास हाजरा असे असून तो आकृती चाळीतच खोली क्रमांक तीन व चारमध्ये राहत असल्याचे सांगितले. अंदाजे ३२ वर्षे वयाच्या संजय हाजरा याची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनीही या हत्येप्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला. आदल्या रात्रीच या इसमाची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला होता. घटनेचा तात्काळ तपास करण्यासाठी उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांच्या निर्देशाने सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हिल लाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. वाघमारे, पोलीस निरीक्षक जीतेंद्र आगरकर व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.
संजय यांची हत्या आदल्या रात्रीच झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी सुरुवातीला नेवाळी गाव व आकृती चाळ परिसरात तपासाला आरंभ केला. आजूबाजूचे रहिवासी व चाळीतले प्रत्यक्षदर्शी आदींकडून पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. त्यांच्या सांगण्यावरून संजयच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध होते. संजयची २१ वर्षीय पत्नी अनुभा ऊर्फ जिलीक हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिने सांगितल्याप्रमाणे ते पूर्वी अंधेरी एमआयडीसीत राहात होते. पोलिसांच्या एका पथकाने या अंधेरी एमआयडीसीतील संजयचे मित्र, सहकारी व नातेवाईकांकडे तात्काळ चौकशी केली. या सगळ्या चौकशीअंती संशयाची सुई ही पत्नी अनुभा हिच्यावर केंद्रित झाली होती. अखेर पोलिसांनी संशयावरून अनुभाला अटक केली. अनुभा हिनेही घडलेल्या गुन्ह्य़ाची कबुली दिली.
संजय हाजरा हा मूळचा पश्चिम बंगाल येथील राहणारा होता. तो पेशाने सोन्याचे दागिने करणारा कारागीर होता. नेवाळी गावातील आकृती चाळ येथे राहण्यापूर्वी मुंबईत अंधेरी एमआयडीसी येथे राहण्यास होता. तेथेच त्याची पत्नी अनुभा हिचे संजीब सिनारॉय याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. याबद्दल संजयच्या मित्र व नातेवाईकांनाही माहिती झाली होती. तसेच, अनुभाच्या प्रेम प्रकरणाला त्याचा विरोध होताच. मात्र पत्नीच्या या अशा वागण्याने तो अत्यंत तणावाखाली आला होता. त्याने अंधेरीतील घर सोडत नेवाळी येथे लांब जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. कारण, पत्नीचा प्रियकर संजीब हाही अंधेरीत राहणारा होता. नेवाळी येथेही आजूबाजूच्यांना या प्रकाराबद्दल माहिती झाली होती.
मुंबईतील घर सोडून येथे आणून ठेवल्याबद्दल अनुभाने प्रियकर संजीबच्या मदतीने त्याची जीवनयात्रा संपविण्याचे ठरविले. दोघेही योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. अखेर २३ नोव्हेंबरच्या रात्री त्याचा खून करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संजय कामावरून घरी आल्यावर दबा धरून बसलेल्या संजीबने त्यांच्या घरी प्रवेश केला. यावेळी संजीबने संजयच्या डाव्या गालावर खाली व वर धारधार शस्त्राने जोरदार वार केला. रात्रीच संजयचा मृतदेह संजीबने घराजवळील गवतात फेकून दिला. अनुभाने कथन केलेल्या या हकिकतीवरून संजीब यालाही अंधेरी एमआयडीसीतून ताब्यात घेतले. यावेळी संजीबनेही गुन्ह्य़ाची कबुली दिली. यावेळी हिल लाइन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कौशल्य पणाला लावत अवघ्या २४ तासात या गुन्ह्य़ाची उकल केली.

लोकसत्ता ठाणेकर व्हा!
‘लोकसत्ता ठाणे’ मध्ये वाचकांनाही सहभाग घेता येणार असून त्यांच्यासाठी ‘वाचक वार्ताहर’, लोकमानस अशी विविध सदरे सुरू करण्यात आली आहेत. या माध्यमातून वाचकांना त्यांची मते, सूचना आणि तक्रारी मांडता येणार आहेत. वाचक वार्ताहर या सदरामध्ये वाचकांनी आपल्या परिसरातील समस्यांची माहिती आणि फोटो पाठवणे गरजेचे आहे. तसेच लोकमानस या सदरामध्ये वाचकांना आपली मते, नागरी समस्या आणि सुचना मांडता येऊ शकतील.
आमचा पत्ता – लोकसत्ता ठाणे कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बॅंकेच्या वर, गोखले रोड, नौपाड, ठाणे (पश्चिम), ४००६०२, ई-मेल – ’२३ँंल्ली2016@ॠें्र’.ूे
दूरध्वनी क्रमांक – २५३८५१३२, फॅक्स – २५४५२९४२