गणेशोत्सवातील मद्यबंदीच्या काळात विनापरवाना वाहतूक करण्यात येत असलेले आठ लाख ७० हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य भाईंदर पोलिसांनी जप्त केले आहे. या वेळी त्यांच्या ताब्यातील वाहने आणि विदेशी मद्य  जप्त करण्यात आले.

गणेशोत्सव तसेच आगमी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मद्यची अवैध वाहतूक, विक्री आणि निर्मिती यावर कडक कारवाई करण्याचे आदेश ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिले आहेत. गणेशोत्सव काळातील काही दिवस मद्यबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

असे असतानाही मद्यबंदीच्या काळात रिक्षा व टेम्पोमधून विनापरवाना विदेशी मद्याच्या मोठय़ा साठय़ाची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत भोसले यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी पोलिसांची पथके तयार करून भाईंदर पूर्व व पश्चिम भागात विदेशी मद्याची वाहतूक करणारी ३ वाहने ताब्यात घेतली. वाहनांच्या चालकांकडे कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांच्याकडे मद्याची वाहतूक करण्याचे परवाने नसल्याचे आढळून आले. या वेळी त्यांच्या ताब्यातील वाहने आणि विदेशी मद्य असा एकंदर ८ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.