वसईतील सरोज जैस्वाल या महिलेच्या हत्येप्रकरणी वालीव पोलिसांनी उत्तर प्रदेशातून मुख्य आरोपीसह चौघांना अटक केली आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
वसई पूर्वेच्या धानीव बागेतील गांधी चाळीतील एका खोलीत ३१ डिसेंबरला सरोज जैस्वाला (२८) या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सरोज गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होती. ती याच परिसरात पती वीरेंद्र आणि सात वर्षांच्या मुलासह राहत होती. गळा चिरून निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली होती. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने याप्रकरणी तपास करून उत्तर प्रदेशातील हातरस जिल्ह्यातील चांदप गावातून अजिम खान आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. चौकशीत त्याने सरोजच्या हत्येची कबुली दिली. याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले की, सरोज आणि आरोपी अजीम यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र आपल्याशिवाय सरोजचे अन्य व्यक्तीबरोबरही अनैतिक संबंध असल्याची माहिती अजीमला मिळाली होती. त्यावरून त्यांच्यात वाद होत असत. त्यामुळे सरोजचा काटा काढण्याची योजना त्याने बनवली. या कामात त्याने आपल्या तीन मित्रांना सहभागी करून घेतले. सरोजला भेटायला खोलीत बोलावले आणि नंतर गळा चिरून तिची हत्या केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 1:54 am