शहराच्या पूर्व विभागातील सारस्वत कॉलनीतील गुरु मंदिर रोडलगत उभ्या असलेल्या एका दुचाकी व चारचाकी गाडीला शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. विजयश्री सोसायटीमध्ये रहाणारे मनीष विसपुते यांची चारचाकी गाडी आहे. त्यांनी आपली गाडी रात्री गुरुमंदिर रस्त्यालगत उभी केली होती. सकाळी पावणे सहाच्या सुमारास गाडीला आग लागली. विसपुते यांच्याकडे दुध टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीने त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता त्यांच्या गाडीसह बाजुला उभ्या असलेल्या दुचाकी गाडीलाही आगीने वेढले असल्याचे दिसले. या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.
तसेच या घटनेपासून काही अंतरावर असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील एका गोदामालाही याचदरम्यान आग लागली होती. गोदामात लाकडी बांबू ठेवले असल्याने लाकडाने पेट घेतल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता. नागरिकांनी याविषयी पोलीस व अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 1:12 am