रेल्वे प्रशासनाकडून बांधकाम करण्यास परवानगी

वसई : नायगाव रेल्वे मार्गावरून पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम रेल्वेच्या परवानगीअभावी गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. मात्र आता रेल्वेने बांधकाम करण्यास परवानगी दिल्याने अखेर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नायगावच्या रहिवाशांना पूर्वेकडून पश्चिमेकडे ये-जा करताना मोठा वळसा घालून जावे लागत होते. हा पूल तयार झाल्यावर या वाहतूक वळशातून त्यांची सुटका होणार आहे.

शहराचे वाढते नागरीकरण आणि वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता नायगाव येथे पूर्व व पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार २०१५मध्ये या उड्डाणपुलाच्या कामाची निविदा काढून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. यासाठी ५६ कोटी २५ लाख निधी मंजूर करण्यात आला असून मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) या पुलाच्या कामाला गती देण्यात आली होती. मात्र दोन वर्षांपूर्वी पुलाचा दोन खांबांमधील काही भाग खाली कोसळला होता.

सध्या या उड्डाणपुलाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र पुलाचा पाया रेल्वेच्या दोन रुळांच्या मध्यभागी असल्याने त्यासाठी रेल्वेची परवानगी मिळणे आवश्यक होते. यासाठी एमएमआरडीएचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यानंतर या पुलाच्या कामाची प्रक्रिया पूर्ण करून रेल्वेने या भागात काम करण्यास परवानगी दिली.

नागरिकांचा सोयीस्कर प्रवास

नायगाव पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला एमएमआरडीएने गती दिली असून लवकरच या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या पुलामुळे मुंबई ते वसई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे येणाऱ्या नागरिकांना वसईला वळसा घालून जावे लागत होते. मात्र त्यातून त्यांची सुटका होणार आहे. वसईच्या गावात

राहणाऱ्या नागरिकांनाही महामार्ग किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी याचा फायदा होणार असून यामुळे वेळ व इंधन यांची बचत होणार आहे.