दोन गटांतील वाद; चार आरोपींना अटक

डोंबिवली : ‘प्ले बॉय’ कंपनीमध्ये नोकरी देतो असा संदेश ‘व्हॉट्सअ‍ॅपपवर पाठविल्यामुळे डोंबिवलीतील दोन तरुणांच्या गटात वाद होऊन त्यात एका तरुणाचा त्यात मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणातील चार जणांना अटक केली आहे.

जुनी डोंबिवलीतील सखारामनगरमध्ये राहणाऱ्या सौरव मोहिते याने आपला मित्र अशोक सिंगला ‘प्ले बॉय’ कंपनीत नोकरी देतो, असा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला. अशोकला तो संदेश आवडला नाही. त्याने शनिवारी याबाबत सौरवला जाब विचारला. सौरवने ही माहिती आपल्या मित्रांना दिली. त्यानंतर अशोक व सौरव यांच्यात व्हॉट्सअ‍ॅप संदेशावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान तुफान हाणामारी आणि सशस्त्र हल्ल्यात झाले.  नंदू पवार, महेश पवार, अशोक सिंग, हर्ष सोळंकी, रोहन म्हात्रे, युसुफ खान आणि इतर तीन जणांनी सौरव मोहिते, कुंदन जोशी, मुकेश जोशी, नीलेश तागारी यांच्यावर हल्ला चढविला. या हाणामारीत कुंदन जोशीचा मृत्यू झाला. अन्य तीन जण गंभीर जखमी झाले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुणगेकर यांनी तपास पथके तयार करून फरार होण्याच्या मार्गावर असलेल्या चार आरोपींना शहराच्या विविध भागांतून अटक केली.