लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुढील सहा महिन्यांसाठी १०० परिचारिकांची पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लवकरच त्यासाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा भार हलका होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-ठाणे : दिवाळी पहाट निमित्ताने वाहतुक बदल

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२५ शिकाऊ आणि सुमारे १५० तज्ज्ञ डॉक्टर आहेत. रुग्णालयात २१० परिचारिकांची पदे मंजुर आहेत. त्यातील १८० पदे भरली गेली आहेत. रुग्णांच्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे परिचारिकांची पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार जातीनिहाय तब्बल १०० पदे भरली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु ही कंत्राटी पद भरती केवळ सहा महिन्यांसाठी असेल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. लवकरच यासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे.