दहावीची परीक्षा म्हणजे, आयुष्यातली पहिली कसोटी. शाळेच्या चार भिंतींमध्ये मजामस्ती करणारे मित्र-मैत्रिणी, शिक्षणासोबत संस्काराचे धडे देणारे शिक्षक, घराइतकाच प्रिय असलेला वर्ग अशा सुखकर विश्वातून विद्यार्थ्यांचं पहिलं पाऊल बाहेर पडतं ते या परीक्षेतूनच. शैक्षणिक कारकीर्दच नव्हे तर अवघ्या आयुष्याला आकार देणाऱ्या या परीक्षेचं महत्त्व ओघाने येतंच. पण तरीही आसपासचा प्रत्येक जण वेळोवेळी ते महत्त्व अधोरेखित करीत असतो. पहिल्या पेपरच्या दिवशी मित्रमंडळी, कुटुंब, आप्तेष्ट यांच्यासोबत अगदी वृत्तपत्रांतूनही होणारा ‘ऑल द बेस्ट’चा घोष हे दडपण आणखी वाढवतो. या सगळय़ा गोष्टींमुळे परीक्षा केंद्रातील आपल्या खोलीत पोहोचेपर्यंत विषयाची उजळणी सुरूच असते. परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतचा प्रवासही उजळणीतच जातो आणि तेथे पोहोचल्यानंतरही ओळखी-अनोळखी परीक्षार्थीसोबत ‘काही राहिलं तर नाही ना’ याचीच चर्चा सुरू असते. पण जशी परीक्षेची घंटा वाजते, तसं सारं वातावरण चिडीचूप होऊन जातं. तीन तासांचा तो पहिला पेपर संपून बाहेर आल्यानंतर ‘अरेच्चा, इतकं काही कठीण नाही!’ याची जाणीव होते आणि सकाळपासून ताणलेले दिसणारे चेहरे ‘ऑल इज वेल’ म्हणत म्हणत घराकडे परततात.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2016 रोजी प्रकाशित
इन फोकस : तो बोलो, ‘ऑल इज वेल’!
शैक्षणिक कारकीर्दच नव्हे तर अवघ्या आयुष्याला आकार देणाऱ्या या परीक्षेचं महत्त्व ओघाने येतंच.

First published on: 02-03-2016 at 01:45 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10th examination