कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेची मालमत्ता कर आणि मुक्त जमीन कराची ११४ कोटी १० लाख ३४ हजार ७२९ रुपयांची थकित रक्कम विहित वेळेत भरणा न करणाऱ्या कल्याणमधील २६ विकासक, जमीन मालकांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय पालिकेच्या कर विभागाने घेतला आहे. या मालमत्तांच्या लिलावातून मिळणाऱ्या रकमेतून थकित रक्कम वसूल केली जाणार आहे.
२६ मालमत्तांचा लिलाव केल्यानंतर पालिका प्रशासनाला ४९८ कोटी ९६ लाख १० हजार ६५४ रुपये आधारभूत किंमत मिळणार आहे. या रकमेतून थकबाकीदारांची कराची रक्कम वसूल करून प्रशासन उर्वरित रक्कम संबंधित थकबाकीदारांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया पार पाडणार आहे.
२६ थकबाकीदारांकडे पालिकेची अनेक वर्षांची मालमत्ता कर आणि मुक्त जमीन कराची थकबाकी आहे. पालिकेने अनेक वेळा या थकबाकीदारांना कर भरण्यासाठी नोटिसा दिल्या. त्याची दखल थकबाकीदारांनी घेतली नाही. थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केल्या. त्याचाही लाभ थकबाकीदारांनी घेतला नाही. थकबाकीदार निर्ढावलेले असल्याने पालिकेने त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव जाहीर केला आहे. ८ एप्रिल रोजी कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात जप्त २६ मालमत्तांचा लिलाव होणार आहे.
हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!
जप्त मालमत्तांचे एकूण क्षेत्रफळ ८८ हजार ८७६ चौरस मीटर आहे. मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी या मालमत्ता जप्त आणि लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. जप्तीनंंतर या मालमत्ता अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून सोडवून घेतल्या जातात, असे एका अधिकाऱ्याने यापूर्वीच्या अनुभवातून सांगितले.
थकबाकीदारांची नावे
चिकणघर येथील कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) चा विकासक श्रीकांत शितोळे यांचा अवंती प्रकल्प (थकित रक्कम ६५ लाख ४३ हजार), हसमुख पटेल यांची फाॅर्मर कोकण वसाहत (३४ लाख ४५ हजार), गौरीपाडा येथील ओमसाई कन्स्ट्रक्शचे अजय पांडे (३० लाख २७ हजार), गौरीपाडा येथील गोपीनाथ आणि चंद्रकांत मानेरकर (५७ लाख ५८ हजार), चिकणघर येथील जयेश ठक्कर यांचे शाहिंद आर ॲन्ड पवन ग्रुप तेजबहादुर कन्स्ट्रक्शन (५९ लाख १७ हजार), मारोती घुडे (५७ लाख ), सुरेश वाधवा आणि सुशीलाबाई देशमुख (६५ लाख ९८ हजार), संजयकुमार ठक्कर यांचे आशापुरा एन्टरप्रायझेस (३६ लाख ), लिला भावसार यांचे चिन्मय बिल्डर्स (१८ लाख ), मांडा येथील मुकुंद केतकर (६० लाख ), टिटवाळा येथील संदीप तरे (७० लाख ), मांडा येथील प्रफुल्ला घोलकर, माऊली डेव्हलपर्स (२६ लाख ), टिटवाळा येथील मंदाकिनी वाघंबरे (३५ लाख), टिटवाळा येथील विजयनारायण पंडित (१८ लाख ), सुनील पाटील (२७ लाख ८० हजार), मोतीराम ढाणे (४२ कोटी), जे. एच. झोझवाला (७८ लाख), बारावे येथे श्रीकांत शितोळे (८३ लाख ५९ हजार), अशोक कोनकर, अशोक चौधरी (१४ लाख), वाडेघर येथील पवन इस्टेट (२८ लाख), बाळाराम लोखंडे (१६ लाख ७३ हजार), रॅडमिनचे संजय कनकोसे (एक कोटी ३१ लाख), उंबर्डे महेश भगवानदास पटेल (७७ लाख), हनुमान जाधव (७१ लाख), जयेश ठक्कर (३८ लाख), वैष्णवी आणि रॅडमिन डेव्हलपर्स (६७ लाख).