डोंबिवलीलगत असलेल्या ग्रामीण भागातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असतानाच आता या भागात रोगराई पसरू लागली आहे. गेल्या महिनाभरात २७ गाव परिसरात १३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. हा आकडा प्रत्यक्षात मोठा असल्याचे बोलले जाते. महापालिकेत समावेश होऊनही या भागात पुरेशा प्रमाणात सफाई होत नसल्यामुळे रोगराई वाढल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.कल्याण-डोंबिवलीतील २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाली तरी या भागात सोयी सुविधांची अद्याप वानवा असल्याने नागरिक संतापले आहेत. त्यातच आता रोगराईने या भागात हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवली शहरात स्वाईन फ्ल्यूने आजारी असलेले ३२ संशयित रुग्ण आढळले आहेत. असे असताना डोंबिवली आणि विशेषत: ग्रामीण भागात डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णांचा आकडाही मोठा असल्याचे दिसून येत आहे. २७ गावांमध्ये १३ नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.साथीचे रोग, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांची लागण होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या प्रभागांमध्ये दिवसाआड धूर फवारणी केली जाणे आवश्यक आहे. असे असताना ग्रामीण भागात पुरेशा प्रभावीपणे फवारणी होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ग्रामीण भागासाठी नव्याने बनविण्यात आलेल्या ई प्रभागात यासंबंधी स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. २७ गावांपैकी सागांव येथील मारुती मंदिराजवळ तसेच नाला परिसरात मोठय़ा प्रमाणात कचरा साचला आहे. हा कचरा लवकर उचलला जात नाही. यामुळे डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे.