Thane – Diva ठाणे : अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देताच, पाणी पुरवठा विभागाने अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळजोडण्या तोडण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत गेल्या दोन दिवसांत दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
या नळजोडण्या घेण्यात आल्याचे समोर आले असून यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने सांगतिले. तसेच याच कारवाईत १० मोटर पंप जप्त करण्यात आले तर, ११ बोअरवेल बंद करण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. या इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा होत असल्याने येथे रहिवाशी वास्तव्यास येतात. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने अशी बांधकामे उभी राहू नयेत यासाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज आणि पुरवठा करण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वीज कंपन्या आणि पाणी पुरवठा विभागाची बैठक घेतली होती. त्यात अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज आणि पाणी पुरवठा देऊ नका, असे स्पष्ट निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यानुसार ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने अनधिकृत इमारतींच्या नळजोडण्या खंडीत करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
या बांधकामांचा पाणी पुरवठा खंडीत
अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावीत. तसेच, बांधकाम अनधिकृत असल्यास नळजोडणी तात्काळ खंडीत करण्यात यावी, त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळजोडणी घेतली असेल तर तीही तातडीने खंडीत करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी पाणी पुरवठा विभागास दिले आहेत. त्यानुसार, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात २५ आणि २६ जुलै रोजी अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता (पाणी पुरवठा विभाग) विनोद पवार यांनी दिली. या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोअरवेलही बंद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
१४ नळ जोडण्या खंडित
दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. या कारवाईत १० मोटर पंप जप्त करण्यात आले तर, ११ बोअरवेल बंद करण्यात आल्या. या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या, असे कारवाईदरम्यान समोर आले आहे. यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील शिळ-महापे रोड परिसर, दातिवली रोड, शांती नगर, मुनीर कम्पाऊंड या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली.