ठाणे : गोविंदांची पंढरी अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात यंदाही दहीहंडी उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारणीकरीता परवानगी मिळावी यासाठी ३८ मंडळांनी पालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी २१ मंडळांना पालिकेने परवानगी दिली आहे तर, १७ मंडळे अद्याप परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीमध्ये दरवर्षी रस्त्यावर दहीहंडी उत्सव साजरा होतो. मात्र, या दोन्ही प्रभाग समिती क्षेत्रात मात्र मंडप उभारणीसाठी एकही अर्ज दाखल झालेला नसल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रस्ते आणि पदपथ अडवून उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू आहे. अनेक मंडळे निम्मा रस्ताच अडवित असल्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच परिसरातील नागरिकांंना पदपथावरून जाण्यासाठी मार्गच उपलब्ध होत नव्हता. या संदर्भात उच्च न्यायलयात जनहित याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी देताना न्यायलयाने मंडप उभारणीसाठी काही मागदर्शक तत्वे आखून दिली आहेत.
यानुसार रस्त्यांच्या एक तृतीयांश भागात मंडप उभारणीस पालिकेकडून परवानगी देण्यात येते. त्यासाठी अग्निशमन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या ना हरकत दाखला आवश्यक असतो. यानंतर पालिका मंडप उभारणीसाठी अंतिम परवानगी देते. अशा परवानगीसाठी पालिकेने एक खिडकी योजनाही सुरू केली होती. याशिवाय, ऑनलाईन आणि थेट पालिकेत अर्ज करण्याची सुविधाही काही वर्षांपासून उपलब्ध करून दिली आहे.
यंदाच्या वर्षी ठाणे महापालिकेकडे आतापर्यंत ३८ दहीहंडी उत्सव मंडळांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये ४ मंडळांनी ऑनलाईनद्वारे अर्ज दाखल केले आहेत तर, ३४ मंडळांनी पालिका कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत. ३८ मंडळांच्या अर्जांपैकी २१ मंडळांच्या अर्जांवर पालिकेने अंतिम निर्णय घेऊन त्यांना मंडप उभारणीस परवानगी दिली आहे. तर, २१ मंडळांचे अर्ज परवानगी मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
प्रभाग समितीनिहाय आकडेवारी
प्रभाग समिती अर्ज संख्या परवानी दिलेली संख्या
नौपाडा-कोपरी ९ ४
वागळे इस्टेट ३ ३
लोकमान्य-सावरकर ४ ३
वर्तकनगर १० ६
माजिवाडा-मानपाडा ५ २
उथळसर ३ २
कळवा ४ १
मुंब्रा – –
दिवा – –
एकूण ३८ २१