ठाणे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्यावर गेली असून शनिवारी जिल्ह्य़ात १८४ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नवी मुंबईत एकाच दिवसात ६५ तर ठाणे शहरात ६० नवे रुग्ण आढळून आले असून त्यापाठोपाठ कल्याण शहरात २५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर उल्हासनगरमध्ये १६, मीरा-भाईंदरमध्ये सात, बदलापूरमध्ये पाच, ठाणे ग्रामीणमध्ये पाच आणि उल्हासनगरमध्ये एक अशा नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून शनिवारी तीन करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवार सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या २००६ इतकी झाली असून नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.

जिल्ह्य़ात करोना विषाणू संसर्गाने शनिवारी नवा उच्चांक गाठला असून दिवसभरात १८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नवी मुंबई आणि ठाणे शहरात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असून नवी मुंबई ६५, तर ठाण्यात ६० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील करोनाबाधितांचा आकडा ५९२, तर ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या ६७१ इतकी झाली आहे.

वाढत्या रुग्ण संख्येमुळे ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे चित्र आहे.

वसई-विरारमध्ये ११ नवे रुग्ण

वसई : वसई-विरार शहरात शनिवारी ११ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण बाधितांची संख्या २०२ इतकी झाली आहे. शनिवारी नालासोपाऱ्यात ७ आणि विरारमध्ये ४ करोनाबाधित आढळून आले. यात रुग्णालय कर्मचारी, हॉटेल कर्मचारी, डिलिव्हरी बॉय आणि करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा समावेश आहे. शनिवारी ३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे शहरातील करोनामुक्त रुग्णांची संख्या १०४ इतकी झाली आहे. मीरा-भाईंदर शहरात शनिवारी ७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले.

नवी मुंबईत ६५ नवे रुग्ण

नवी मुंबई : शहरात शनिवारी ६५ नवे रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. नवी मुंबई शहरात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून, एकूण बाधितांची संख्या ५९२ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १२ झाली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक व्यापारी आणि सानपाडा येथील बेस्ट कंडक्टरचा मृत्यू झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.  पनवेलमध्ये शनिवारी दोघा करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 184 new corona patients in thane district abn
First published on: 10-05-2020 at 00:43 IST