२७ हजार संशयितांच्या तपासणीतून सकारात्मक रुग्ण निश्चित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या विविध भागात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या एड्स नियंत्रण कक्षाने वर्षभर राबविलेल्या मोहिमेत २७ हजार ८५३ संशयित एड्स रुग्णांच्या तपासणी केली. या रुग्णांमधील २६० जणांना एड्सची बाधा झाली असल्याचे तपासणीत उघड झाले. अशा रुग्णांवर पालिकेकडून मोफत वैद्यकीय उपचार केले जात आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली.

एड्स नियंत्रण कार्यक्रमातून कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव भागातील एकूण १८ नागरी आरोग्य केंद्रांवर वर्षातून दोन वेळा आरोग्य शिबीराचे आयोजन केले जाते. या शिबीरातून काही नागरिकांमध्ये एड्स सदृश्य लक्षणे दिसून येतात. या नागरिकांच्या अत्यावश्यक तपासण्या करुन त्यांच्यावर तातडीने पालिकेकडून उपचार सुरू केले जातात. या रुग्णांवर पालिकेकडून लक्ष ठेवले जाते. ते वेळेत औषधोपचार घेतात का याचा पाठपुरावा एड्स नियंत्रण विभागातील कर्मचारी करतात, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. १९९० च्या दशकात एड्सचा फैलाव होऊ लागला. त्यानंतर केंद्र, राज्य शासनाने या रोगाच्या उच्चाटनासाठी विविध उपक्रम हाती घेतले.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात आज महत्त्वाची बैठक

१९९२ पासून देशाच्या इतर भागासह महाराष्ट्रात एड्स नियंत्रणाचा प्रभावी कार्यक्रम राबविण्यात येऊ लागला. एड्सचा संसर्ग रोखण्यासाठी झोपडपट्ट्या, चाळी, बेघर वस्ती भागात जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. चांगल्या वस्तीमधील पण आजार कोणास कळू नये म्हणून खासगी रुग्णालयांच्यामधून काही एड्स रुग्ण उपचार घेतात. त्यांची माहिती खासगी रुग्णालयाकडून पालिकेला कळविण्यात येते. अशा रुग्णांच्या सहकार्यासाठी, वैद्यकीय उपचारासाठी पालिका पुढाकार घेते, असे अधिकारी म्हणाला. पालिका नागरी आरोग्य केंद्रात मोफत एड्स समुपदेशन व चाचणी केंद्रात मोफत एड्स चाचणी केली जाते. रुग्णाचे नाव गोपनीय राहिल याची पूर्ण काळजी प्रशासनातर्फे घेतली जाते. सामान्य रुग्ण, गर्भवती महिला, फिरस्ते, भिकारी, क्षयरोगी, प्रदीर्घ आजाराचे रुग्ण यांच्या पालिकेकडून उपलब्ध माहितीप्रमाणे एड्स चाचण्या केल्या जातात.

हेही वाचा >>> ठाणे: आर्थिक संकटात असलेल्या पालिकेवर पडणार सातवा वेतन आयोगाचा भार

कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण पूर्व भागात गीता हरकिसनदास रुग्णालय आणि डोंबिवली पश्चिमेत कोपर मधील शास्त्रीनगर रुग्णालयात आयसीटीसी केंद्रामार्फत एड्स रुग्णांची तपासणी आणि समुपदेशन केले जाते. तपासणी केंद्रात संशयित रुग्णाची चाचणी सकारात्मक आली तर त्याचे समुपदेशन करुन त्या रुग्णाला मानसिक बळ उपलब्ध व्हावे. त्याने नियमित औषधोपचार घ्यावेत म्हणून मार्गदर्शन केंद्रात पाठविले जाते. तेथे त्याला भोजन, रुग्णाने घ्यावयाची काळजी याविषयी समुपदेशन केले जाते. एड्स असल्याचे कळताच काही रुग्ण खचून जातात. अशा रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम समुपदेशन केंद्रातील कर्मचारी करतात. समुपदेशन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे एड्स रुग्ण औषधोपचार, आपल्या तब्येतीत लवकर सुधारणा होईल यादुष्टीने स्वताहून प्रयत्न करतात. संसर्ग रोखणे याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ. समीर सरवणकर यांनी सांगितले. मागील काही वर्षाच्या कालावधीत पालिका हद्दीत एकूण तीन हजार ५७९ एड्स रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एक हजार ८०० पुरुष, एक हजार ६३८ महिला, ५८ तृतीयपंथी आणि आठ बालकांचा समावेश आढळून आला आहे. बहुतांशी रुग्ण झोपड्यांमध्ये आढळून आले आहेत.

“ पालिका हद्दीत एड्स नियंत्रण कार्यक्रम वर्षभर राबविला जातो. संशयित, बाधित रुग्णांच्या तपासणी, औषधोपचार याविषयी विशेष काळजी घेतली जाते. बाधित रुग्णांचे समुपदेशन, संसर्ग रोखणे याकडे विशेष लक्ष दिले जाते.”

डाॅ. समीर सरवणकर, वैद्यकीय अधिकारी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 260 aids patients in kalyan dombivli municipal area ysh
First published on: 02-12-2022 at 12:23 IST