Maharashtra Government, Online Services ठाणे : राज्य सरकारने सुरु केलेल्या आपले सरकार २.० वरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेस आपले सरकार पोर्टलवर २ हजार ७६२ तक्रारी प्राप्त झाल्या असून २ हजार ६६५ तक्रारी निकाली काढल्या आहेत. तर, ९९ तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रीय स्तरावर विस्तृत अहवाल मागणीसाठी प्रलंबित आहेत.
या पोर्टलद्वारे ग्रामस्थांना आपल्या तक्रारी ऑनलाइन दाखल करणे तसेच त्याची सद्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली. आतापर्यंत ९७ टक्के तक्रारी निकाली काढण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे.
शासन निर्देशानुसार २१ दिवसांच्या आतमध्ये आपले सरकार केंद्रावर दाखल झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे अनिवार्य आहे. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारी सरासरी ११ दिवसांच्या आतच निकाली काढण्यात येत असून सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी यासाठी विषेश प्रयत्न केले आहेत.
आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त तक्रारींचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक सोमवारी साप्ताहिक सखोल आढावा घेण्यात येतो. तक्रारदाराची तक्रार मांडणी व्यवस्थित झाली नाही किंवा म्हणणे समजले नाही तर, तक्रारदारास दूरध्वनीवर तात्काळ संपर्क केला जातो.
तक्रारींचे निवारण ठाणे जिल्हा परिषदेकडून उत्तमप्रकारे होत असल्याबाबत समाधान ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), अविनाश फडतरे यांनी दिली. राज्य शासनाच्या १५० दिवस कार्यक्रम या अभियान अंतर्गत आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी निकाली काढण्यासाठी देखील विषेश भर देण्यात येत आहे.
या स्वरुपाच्या तक्रारी आपले सरकार पोर्टलवर करता येतात… ‘आपले सरकार पोर्टल’ हे महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी विविध तक्रारी नोंदविण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी विलंब होणे, प्रमाणपत्रे वेळेत न मिळणे, शासकीय योजनांमध्ये होणारा अडथळा किंवा अनुदान वितरणातील त्रुटी, स्थानिक प्रशासनाशी संबंधित तक्रारी जसे की पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती, गटार साफसफाई, वीजपुरवठा खंडित होणे, चुकीचे देयक येणे, शासकीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रातील सुविधा उपलब्ध नसणे, शाळा-महाविद्यालयातील प्रशासनिक अडचणी अशा विविध सार्वजनिक सेवांशी निगडीत तक्रारी दाखल केल्या जातात. त्यासह, भ्रष्टाचार, लाचलुचपत, नियमांचे उल्लंघन किंवा अन्यायकारक वर्तन याबाबतही नागरिक आपली तक्रार या पोर्टलवरून करू शकतात.
