ठाणे – नवी मुंबई शहराच्या खाडीकिनारी असलेली कांदळवन क्षेत्र हे केवळ हरित सौंदर्य नसून, शहराचे ‘ऑक्सिजन झोन’ आणि समुद्रकिनाऱ्यांचे नैसर्गिक कवच मानले जातात. समुद्रातील भरती-ओहोटी, वादळे, सुनामीसारख्या परिस्थितीत शहराचे रक्षण करणाऱ्या या कांदणवनाच्या बचावासाठी ‘मॅंग्रोव्हज सोल्जर्स’ ही संस्था गेली २७१ आठवडे सलग खाड्यांमध्ये उतरून स्वच्छता मोहीम राबवत आहे. या मोहिमेस ५ वर्ष झाली असून १ लाख स्वयंसेवकांनी १ हजार टन कचरा गोळा केला आहे.

मुंबई महानगर प्रदेशात कांदळवन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. या कांदळवनात विविध जैवविविधता आढळून येतात. तसेच याच परसिरात सोनेरी कोल्ह्यांते वास्तव्य असल्याचीही नोंद आहे. या कांदळवन क्षेत्रात कचरा साचत असून त्यामुळे धोका निर्माण होत आहे. याच कांदळवनाच्या बचावासाठी १५ ऑगस्ट २०२० रोजी ‘मॅंग्रोव्हज सोल्जर्स’ ही संस्थेने २७१ आठवडे स्वच्छता मोहीम सुरू केली. नवी मुंबईच्या वाशी, नेरूळ, सीबीडी आणि खारघर परिसरातील खाड्यांमध्ये दर रविवारी नियमितपणे ही स्वच्छता मोहिम सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत एक लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला असून, जवळपास हजार टनांहून अधिक कचरा या खाड्यांमधून बाहेर काढण्यात आला आहे.

कांदळवनात स्वच्छता करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२० रोजी ‘कांदळवण स्वच्छता अभियान’ या नावाने मोहिम सुरू करण्यात आली. कांदळवने ही आपल्या शहराची सुरक्षा कवच आहेत. तीव्र लाटांपासून, पूरस्थितीतही ही जंगले शहराचे संरक्षण करतात. मात्र, नागरिकांकडून होत असलेल्या प्लास्टिक, थर्माकोल, वैद्यकीय आणि घरगुती कचऱ्यामुळे या वनस्पतींचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे दर आठवड्याला खाड्यांमध्ये उतरून कचरा गोळा केला जातो असे ‘मॅंग्रोव्हज सोल्जर्स’चे संस्थापक धर्मेंश बराई यांनी सांगितले. तसेच कांदळवने ही कार्बन शोषण करणारी झाडे आहेत. इतर झाडांच्या तुलनेत सुमारे पाच पट जास्त कार्बन शोषण करण्याची क्षमता आहे. खेकडे, माशांच्या अंडी घालण्याची ठिकाणे, कोल्हे, मुंगूस, सोनेरी कोल्हे (गोल्डन जॅकल)सारखे वन्यजीव येथे आढळतात. पण वाढत्या प्रदूषणामुळे त्यांच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

एक वर्षापासून या मोहिमेत सहभागी झालो असून आधी मँग्रोव्ह म्हणजे काय, हे माहिती नव्हते. पण आता हे आमच्या शहराचे फुप्फुस आहेत हे जाणवले. कचरा साफ करताना कधी कधी दुःख वाटतं, कारण प्रत्येक आठवड्यात नवा कचरा साचतो. पण आता अधिक लोक या मोहिमेत सहभागी होत आहेत, हे समाधान देणारं आहे अशी प्रतिक्रिया एका स्वयंसेविकाने दिली.