पर्यावरण अहवालातून धक्कादायक माहिती उघड; ४२ पैकी २९ तलाव नामशेष
मागील आठ ते नऊ महिने पाणीटंचाईचे चटके सोसलेल्या कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाला पाण्याचे व नैसर्गिक जलस्रोतांचे महत्त्व पटले नसल्याची बाब उघड झाली आहे. पालिकेच्या दहा प्रभागांमध्ये एकूण ४२ तलाव आहेत. या तलावांचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करून तेथे नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. असे असताना ४२ तलावांमधील तब्बल २९ तलाव माती, गाळ आणि पाणपर्णीने भरलेले असल्याची धक्कादायक माहिती आता उघडकीस आली आहे.
पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यावर पालिका हद्दीमधील तलावांमधील पाण्याचा प्रशासन वापर करू शकते. गेल्या आठ महिन्यांत मार्च ते जून या कालावधीत पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यावर पालिकेने पालिका हद्दीतील खासगी, सार्वजनिक पडीक विहिरी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. शहराची तहान भागविण्यासाठी व पाणी स्रोत वाढविण्यासाठी १२२ प्रभागांमध्ये घाईघाईने कूपनलिका खोदून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. काही टँकरचालकांनी महापालिकेच्या तलावांमधील पाणी विकासकांना, सोसायटय़ांना विकून चांगली कमाई केली. पालिका हद्दीमधील तलावांमधील गाळ उपसून, पानपर्णी काढून प्रशासनाने तलाव अद्ययावत ठेवले तर शहरात पर्यायी पाणीसाठा उपलब्ध होईल. गंभीर परिस्थितीच्या वेळी या साठय़ाचा वापर करणे प्रशासनाला सहज शक्य होईल, असे जाणकारांचे मत आहे.
कल्याण-डोंबिवली ते टिटवाळा परिसरातील ५ लाख ३२ हजार ८११ चौरस मीटर क्षेत्रात तलावांचे क्षेत्र आहे. या सर्वच तलावांची डागडुजी, सफाई केली तर लाखो लिटरचा पाणीसाठा पालिकेला उपलब्ध होणार आहे. पालिका हद्दीतील तलावांचे सुशोभीकरण करण्याचा सविस्तर विकास आराखडा प्रशासनाने तयार करून तो महासभेपुढे ठेवला होता. मागील अनेक वर्षांत सार्वजनिक सुविधेचे भूखंड माफियांनी गिळंकृत केले. तशाच पद्धतीची अवस्था या तलावांची येणाऱ्या काळात होण्याची भीती जाणकार रहिवाशांकडून वर्तवली आहे. पालिकेच्या पर्यावरण अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
तलाव अतिक्रमणाचे बळी
वर्षांनुवर्षे या तलावांची डागडुजी केली नसल्याने बांध कोसळले आहेत. तलावात आजूबाजूने वाहून येणारे सांडपाणी मुरत असल्याने तलावांचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित झाले आहेत. तलावांच्या आजूबाजूला वस्ती वाढली आहे. तलाव आणि जमीन असा फरक काही ठिकाणी राहिलेला नाही. काही तलाव पाणपर्णीने भरून गेले आहेत. गृहप्रकल्पातील मातीचे भराव तलावात आणून टाकले जात आहेत. काही भूमाफियांनी तलावामध्ये इंच इंच बांधकामे करून तलाव गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासमोरील ऐतिहासिक तलावाच्या अवतीभवती तबेले आहेत. या तबेल्यांमधील मलमूत्र, शेण तलावात सोडले जाते. हा तलाव पाणवनस्पतीने भरून गेला आहे. ही संधी साधून भूमाफियांनी तलावाच्या जमिनीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
गाळाने भरलेले तलाव
* अटाळी, आंबिवली, बल्याणी, मांडा, उंबर्डे, सापाड, भटाळे, दावजे, राहटळे, चक्कीनाका, गोळवली, जरीमरी देवी, एफ केबीन विठ्ठलवाडी, नांदिवली, आडीवली, पिसवली, चिंचपाडा, मानपाडा, कोळे, निळजे, काटई, उसरघर, चोळे, भोईरवाडी, आयरे, कोपरगाव, विजयनगर तलाव.
* तलावांचे एकूण क्षेत्रफळ ५ लाख ३२ हजार ८११.
* ४२ पैकी फक्त काळा तलाव सुशोभित व स्वच्छ.
निधीच्या उपलब्धतेप्रमाणे व प्राधान्यक्रम ठरवून तलाव सुशोभीकरण व स्वच्छतेची कामे हाती घेण्यात येतात. यापूर्वी पालिका हद्दीतील तलावांच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, पण तो मंजूर झाला नाही. खासदार, आमदारांकडून मिळणारा विकास निधी, नगरसेवकांची मागणी असा सर्वागीण विचार करून तलाव स्वच्छता व सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येतात.
– प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, कडोंमपा.