उल्हासनगर : सरकारची १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका वेळेवर न आल्याने उल्हासनगरात एका ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवनेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर अखेर उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २३ जानेवारी रोजी राहुल इंधाते या तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

उल्हासनगरच्या कॅम्प १ भागात हर्षवर्धन नगर परिसरात राहणारे राहुल इंधाते यांना २२ जानेवारीच्या मध्यरात्री अचानक शारीरिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना कुटुंबीयांनी तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी येथे प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांची खाजगी रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गुरुवारी दुपारी डॉक्टरांनी राहुलची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना तातडीने कळवा येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका मिळण्यासाठी संपर्क केला. मात्र रूग्णवाहिका येण्यास उशिर झाला. त्यामुळे राहूल यांना दुसऱ्या रूग्णालयात नेण्यास उशिरा झाला. शेवटी कुटुंबीयांनी स्वतःच्या वाहनाने रूग्णाला रूग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयातच रूग्णालाचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर उल्हासनगर शहरातून संपात व्यक्त करण्यात आला होता. तर १०८ रूग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत होती.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय तारांकीत प्रश् म्हणून उपस्थित करण्यात आला. अखेर मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत आणखी एका डॉक्टरचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश आरोग्य सेवा उपसंचालकांनी काढले आहेत. तसेच डॉ. बनसोडे यांना पुढील आदेशपर्यंत मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या निलंबन कारवाईनंतर रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात अडथळा येऊ नये म्हणून शासनाने डॉ. उत्कर्ष दुधेडिया यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या प्रकरणातही केली होती दिरंगाई

बदलापुरातील चिमुकल्या मुलींच्या अत्याचार प्रकरणातही आरोग्य तपासणीसाठी शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात मुलींना कुटुंबासह मोठा काळ प्रतिक्षा करावी लागली होती. त्यानंतर संबंधित डॉक्टरांवर संताप व्यक्त केला जात होता.