ठाणे : भिवंडी येथे एका ३४ वर्षीय महिलेवर तिच्या ओळखीतील ३२ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या तरुणाने मोबाईलमधील तिचे छायाचित्र आणि चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिला आणि तरुणाची ओळख सुमारे वर्षभरापूर्वी बसगाडीतील प्रवासामध्ये झाली होती. त्यानंतर तो तरुण महिलेच्या घरी जाऊन लैंगिक अत्याचार करु लागला. त्यास विरोध केल्यानंतर तो पिडीत महिलेला मारहाण देखील करत असे. त्याने पिडीत महिलेचे छायाचित्र आणि चित्रीकरण देखील मोबाईलमध्ये कैद केले होते. हे छायाचित्र आणि चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तो लैंगिक अत्याचार करु लागला होता.

अखेर महिलेने निजामपूरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सोमवारी तिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (१), ६४ (२)(ड), ११५ (२), ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.