scorecardresearch

कल्याण जवळ रस्ते अपघातात मरण पावलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना ३५ लाखाची भरपाई

मणिकांत कृष्णन याचे वडील रामनाथपुरम, आई राजेश्वरी यांनी मुलाच्या मृत्युप्रकरणी मोटार अपघात हक्क दावा न्यायाधिकरणा समोर नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा केला होता.

कल्याण जवळ रस्ते अपघातात मरण पावलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना ३५ लाखाची भरपाई
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

कल्याण- कल्याण-मुरबाड रस्त्यावर एका अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत कल्याण मधील एक तरुणाचा चार वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. या मयत तरुणाच्या कुटुंबियांना कल्याणच्या मोटार अपघात हक्क दावा न्यायाधिकरणाचे अध्यक्ष एम. एम. वलीमोहम्मद यांनी वाहन मालक आणि त्या वाहनाची विमा कंपनी यांना एकत्रितपणे ३४ लाख ८७ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मणिकांत कृष्णन (२७) असे मयत तरुणाचे नाव होते. तो डब्ब्युटीडब्ल्यु ग्लोबल डिलिव्हरी आणि सोल्युशन्स कंपनीत नोकरीला होता. त्याला दरमहा ५६ हजार रुपये वेतन होते. तो घरातील एकमेव कमविता होता. त्याच्या उतपन्नावर कुटुंबियांची गुजराण होत होती.

मणिकांत कृष्णन याचे वडील रामनाथपुरम, आई राजेश्वरी यांनी मुलाच्या मृत्युप्रकरणी मोटार अपघात हक्क दावा न्यायाधिकरणा समोर नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा केला होता. कृष्णन यांच्यातर्फे ॲड. सचिन माने यांनी न्यायाधिकरणाला सांगितले, २५ मे २०१९ रोजी मयत मणिकांत आपल्या दुचाकीवरुन आपल्या मित्रा सोबत मुरबाड येथे चालले होते. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान कल्याण-मुरबाड रस्त्यावरुन जात असताना मणिकांत यांच्या दुचाकीला एका अवजड वाहनाने जोराची धडक दिली.

हेही वाचा : विमा बंद करण्याच्या नावाखाली २६ लाखांचा गंडा ; उल्हासनगरातील महिलेला फसवले, गुन्हा दाखल

तो दुचाकीसह खाली पडून जागीच मयत झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. तो बचावला. वाहन चालकाच्या निष्काळजीमुळे हा अपघात झाल्याने त्याच्या मिळकतीवर अवलंबून असलेल्या आई, वडील यांना भरपाई मिळाली पाहिजे, असे ॲड. माने यांनी न्यायाधिकरणाला सांगितले.न्यायालयाने वाहन मालक, न्यु इंडिया इन्शुरन्स विमा कंपनी यांचे म्हणणे ऐकून घेऊन सबळ पुराव्यांचा आधार घेऊन मयत मुलाच्या कुटुंबियांना ३४ लाखाची भरपाई देण्याचे आदेश वाहन मालक, विमा कंपनीला दिले. या दोन्ही व्यवस्थापनांतर्फे ॲड. आशा सकपाळ, ॲड. के. व्ही. पुजारी यांनी बाजू मांडली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या