पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने एमएमआरडीएची मदत

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था, महापुरानंतर रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे नोकरदार, वाहन चालकांना होणारा त्रास विचारात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कडोंमपातील रस्त्यांसाठी ३६० कोटींचा निधी मंजूर केला. पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने एमएमआरडीएने पालिकेला निधी देण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्राधिकरणाकडे केली होती.

पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. शिंदे यांनी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्याबरोबर बैठका घेऊन पालिकेला वेळेत निधी देण्याची मागणी केली होती. पालिका हद्दीतील खराब रस्त्यांची माहिती खा. शिंदे यांनी घेऊन ती प्राधिकरणाला दिली होती. ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्ग आणि रस्ता विकासासाठी २० कोटी, स्टार कॉलनी ते समर्थ चौक रस्ता काँक्रीटीकरण ३४ कोटी, आडिवली मलंग रस्ता ते तलाव २१ कोटी, मलंग रस्ता ते आरटीओ चाचणी केंद्र, म्हसोबा चौक ते माणेरे कमान १० कोटी, व्हीनस चौक ते श्रीराम चौक १७ कोटी, शीळ ते संदप रस्ता १६ कोटी, नांदिवली गजानन चौक ते नाला १४ कोटी, डोंबिवली शहर परिसरातील नियमित व विकास आराखडय़ातील रस्त्यांसाठी ८७ कोटी, कल्याण ग्रामीण भागासाठी १११ कोटी, कल्याण पूर्व भागासाठी १२३ कोटी, कल्याण पश्चिमेसाठी ३७ कोटी असा सुमारे ३६० कोटी ६४ लाखांचा निधी पालिका हद्दीसाठी प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आला आहे.

रस्त्यांची दुर्दशा झाली असताना हा निधी मंजूर झाल्याने नोकरदार वर्गाने सर्वाधिक समाधान व्यक्त केले आहे. ही कामे मंजूर करून आणून विरोधकांच्या टीकेला खासदारांनी कृतीने उत्तर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच एमआयडीसी हद्दीतील रस्त्यांसाठी ११० कोटींचा निधी एमआयडीसीने उपलब्ध करून दिला आहे.

या निधीतून नियमित वर्दळीच्या रस्त्यांची दुरुस्ती, विकास आराखडय़ातील रस्ते विकासाची कामे सुरू करणे, रस्ते दुपदरीकरण करणे ही कामे हाती घेतली जातील.

– खा. डॉ. श्रीकांत शिंदे