परदेश प्रवास करून परत आलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात ३८ प्रवाशांना होम क्वारंटाइनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून तालुक्यात इतर जिल्ह्यातून आलेले देखील होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तालुका आरोग्य पथकाच्या दररोज होणाऱ्या तपासणीमुळे त्यांच्यामध्ये कोरोना सदृश लक्षण अजून आढळून आली नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी शहापूर तालुक्यालगत असलेल्या मुरबाड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने शहापुरात मात्र भीती वाढली आहे.

शहापूर तालुक्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीला दाखल झालेले ३८ परदेशी प्रवासी १८ मार्चपासून होम क्वारंटाइनमध्ये आहेत. याशिवाय खबरदारीचा उपाय म्हणून पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नवी-मुंबई, कल्याण येथून आलेल्यांना देखील होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांची दररोज चौकशी, तपासणी केली जात आहे. पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस यांच्याकडून तालुक्यात कोरोना संदर्भात जनजागृती करून त्याची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे शहापुरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी सांगितले. शहापुरसह तालुक्यातील विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा, गट प्रवर्तक यांचे पथक तयार करण्यात आले असून होम क्वारंटाइन असलेल्या परदेशी प्रवाशांना सर्दी, खोकला, ताप, घसादुखी याचा त्रास होतोय का? याची दररोज चौकशी करून तपासणी करण्यात येत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी तरुलता धानके यांनी सांगितले.

शहापूर तालुका कोरोनाच्या विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी लोकांना आवाहन केले आहे की, सर्वांनी घरातच बसून राहून प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनातील सर्व लोक त्यांच्या कुटुंबाची पर्वा न करता स्वत:चा जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी अहोरात्र यंत्रणा राबवित आहेत, त्याची आपण जाणीव ठेवून आपण आपत्कालीन स्थिती वगळता घराबाहेर पडू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.